Crime News : एका सुनेने तिच्या 72 वर्षीय सासूला मारहाण केल्याप्रकरणी खार पोलिसांनी सुनेला अटक केली आहे. याबाबत माहिती मिळताच महिला कॉन्स्टेबलने घटनास्थळी धाव घेऊन मारहाण झालेल्या वृद्धेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. जखमी वृद्धेला जबर मारहाण झाल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती, त्यामुळे महिला पोलिस शिपाई म्हात्रे यांनी त्यांना हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले. त्यानंतर इमारतीपासून शंभर मीटर अंतर तसेच कडेवर उचलून रस्त्यापर्यंत आणले आणि एका वाहनात बसवून रूग्णालयात दाखल केले. वृद्ध महिलेला चालता येत नसल्याने पोलिस शिपाई म्हात्रे यांनी कडेवर उचलून आणलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. म्हात्रे यांची तत्परता पाहून त्यांचं सोशल मीडियावरून आणि परिसरातून कौतुक होत आहे.
वेणूबाई वाते या मुंबईतील खार दांडा खार पश्चिम येथे राहतात. किरकोळ वादातून त्यांच्या सुनेने त्यांना मारहाण केली. याबाबत पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली. त्यांनतर कंट्रोल रूमकडून खार पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक घोगरे, पोलिस शिपाई घारगे, महिला पोलिस शिपाई म्हात्रे यांना याबाबतची माहिती मिळाली. माहिती मिळताच हे सर्व जण घटनास्थळी पोहोचले. यावेळी माराहणीत जखमी झाल्यामुळे वृद्ध महिलेस कसल्याही प्रकारची हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे महिला पोलिस शिपाई म्हात्रे यांनी त्यांना हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले. तेथून शंभर मीटर अंतर रस्त्यावर आणले आणि एका वाहनातून भाभा हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले, अशी एका पोलिस आधिकारीने दिली.
खार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी सांगितले की, "आम्ही भारतीय दंड संहितेच्या कलम 324 नुसार मारहाण करणाऱ्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. तपासादरम्यान सून आणि सासू यांच्यात काही शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सासूला प्लास्टिकच्या काठीने मारहाण करण्यात आली. त्यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे.
"या मारहाणीबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला एकटी आढळली. काही वेळानंतर तिच्या दुसऱ्या सूनेने उद्या दवाखान्यात घेऊन जाईल, घरी पुरुष नाही, असे सांगितले. यावेळी आमच्या महिला कॉन्स्टेबल म्हात्रे यांनी वृद्ध महिलेला कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले आणि उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. किरकोळ दुखापत असल्याने तिला उपचारानंतर घरी सोडण्यात आले, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन माने यांनी दिली आहे.
दरम्यान, पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत. असं कोणतं कारण होतं की, सुनेने सासुला जखमी होईपर्यंत अमानुष मारहाण केली. याची माहिती मिळवण्याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, सद्या जखमी झालेल्या वृद्ध महिलेची तब्येत स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या