Omicron in Maharashtra : जगभराची झोप उडवणाऱ्या ओमायक्रॉन व्हेरियंटने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. डोंबिवलीनंतर आता पुण्यात तब्बल 7 जणांना या व्हेरियंटची लागण झाल्याने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती देत संबधित रुग्णांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली आहे.


महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णसंख्या वाढली आहे. नुकतेच 7 नवे रुग्ण पुण्यात आढळले असून यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 8 झाली आहे. याबाबत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, 'सर्व ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती ठिक असून त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणं आढळली आहेत. तर यातील 3 रुग्णांना मात्र कुठलीच लक्षणं नसल्याचंही समोर आलं आहे.'


एकाच कुटुंबातील सहा रुग्ण –
पिंपरी चिंचवडमधील एकाच कुटुंबातील सहा रुग्णांना ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाली आहे. 24 नोव्हेंबर रोजी नायजेरियातून भावाला भेटण्यासाठी आलेल्या 44 वर्षीय महिलेला, तिच्यासोबत आलेल्य दोन मुलींना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्याशिवाय त्या महिलेचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुलींनाही ओमायक्रॉनची लागण झाली आहे. सर्वांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून पिंपरी-चिंचवडमधील जिजामाता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटच्या सहा रुग्णापैकी तीन जण 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत.


पुण्यातील व्यक्तीला ओमायक्रॉन –
पुण्यातील 47 वर्षीय व्यक्तीलाही ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही दिवसांपूर्वी फिनलँड देशात गेला होता.  29 तारखेला त्या व्यक्ताला ताप आला होता. त्यामुळे त्या व्यक्तीनं कोरोना चाचणी केली. यामध्ये तो पॉझिटिव्ह आढळला होता. या व्यक्तीने कोविशिल्ड लस घेतली आहे. या व्यक्तीला कोणतीही लक्षणं नाहीत. प्रकृती स्थिर आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha