6th May In History: आजचा दिवस हा देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांचे आजच्याच दिवशी निधन झालं होतं. तर 26 नोव्हेंबर 2011 सालच्या मुंबई हल्ल्यातील जिवंत सापडलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाबलाही आजच्याच दिवशीस फाशी देण्यात आली होती. जाणून घेऊया आजच्या दिवशीच्या इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी.


1856 : आधुनिक मानसशास्त्राचे जनक सिग्मंड फ्रॉइड यांचा जन्म


सिग्मंड फ्रॉइड (Sigmund Freud) हे प्रख्यात ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, वैद्य आणि मनोविश्लेषणाचे प्रणेते होते. सिग्मंड फ्रॉइड यांनी विश्लेषणात्मक मानसशास्त्रात पायाभूत संशोधन केले. विसाव्या शतकातील एक थोर विचारवंत म्हणून फ्रॉइड यांचे स्थान आहे. त्यांनी मानवी मनाबाबत मांडलेल्या संकल्पनांमुळे मानवी स्वभावाबाबतच्या पारंपारिक कल्पनांमध्ये फार मोठी उलथापालथ झाली. 


1857 : ब्रिटिशांनी उठाव करणारी 34 वी रेजिमेंट बरखास्त केली


ब्रिटिशांनी आणलेल्या नव्या एन्फिल्ड बंदुकीच्या काडतुसांना गायीची आणि डुकराची चरबी लावली असल्याचा आरोप होता. त्याविरोधात मंगल पांडे यांने सैन्यात उठाव केला. त्यानंतर बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्रीची 34 वी रेजिमेंट बरखास्त करण्यात आली. नंतरच्या काळात बंगालमध्ये 1857 च्या उठावाला सुरुवात झाली आणि त्याचा प्रसार संपूर्ण देशभर झाला. 


1861 : मोतीलाल नेहरु यांचा जन्म


भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल नेहरु (Motilal Nehru) यांचा जन्म 6 मे 1861 रोजी प्रयागराज या ठिकाणी झाला. पंडित मोतीलाल नेहरू हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडील होते. ते अलाहाबाद येथील एक नामवंत वकील होते. पुढे त्यांनी वकिली सोडून दिली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात झोकून दिलं. 1923 साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास आणि लाला लजपत राय यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 1928 साली कोलकाता येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच 1928 मध्ये काँग्रेस पक्षाने भारताची भावी राज्यघटना बनवण्यासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. 


1889 : पॅरिसमधील आयफेल टॉवर लोकांसाठी खुला 


आयफेल टॉवर (Eiffel Tower)ही 1889 साली बांधली गेलेली पॅरिसमधील एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. फ्रान्सची ओळख ही आयफेल टॉवरनमुळे होते. आयफेल टॉवर 324 मीटर उंच आहे आणि त्याला तीन मजले आहेत. गुस्ताव्ह आयफेल या फ्रेंच वास्तूशास्त्रकाराला आयफेल टॉवर निर्मितीचे श्रेय दिले जाते. फ्रेंच क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ सुमारे 300 कामगारांनी 18,038 अतिशुद्ध लोखंडाचे भाग वापरून आयफेल टॉवर बांधला. 31 मार्च 1889 रोजी त्याचे उद्घाटन झाले. 6 मे 1889 रोजी आयफेल टॉवर लोकांसाठी खुला करण्यात आला.


1922 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन


महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सामाजिक क्रांतीमध्ये ज्या काही समाजसेवकांचे नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते आणि करवीर संस्थानचे अधिपती राजर्षी शाहू महाराजांचे (Rajarshi Shahu Maharaj) आजच्याच दिवशी म्हणजे 6 मे 1922 रोजी निधन झालं. मुंबईतील पन्हाळा लॉज या ठिकाणी त्यांचं निधन झालं. 


वेदोक्त प्रकरणानंतर शाहू महाराजांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं आणि त्यांनी समाजातल्या रंजल्या गांजल्या आणि दलित मागासवर्गीयांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिलं. आपलं राजेपद समाजातील तळागाळातील लोकांच्या उद्धारासाठी वापरलं. 1902 साली कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांचा हा निर्णय देशातील पहिलाच निर्णय असून त्यांना आरक्षणाचे जनक म्हटलं जातं. तसेच सर्व जातीसमूहातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी कोल्हापुरात विविध वसतीगृहांची स्थापना केली. 


शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे  क्षत्रिय कुर्मी सभेने त्यांना  1919 साली 'राजर्षी' पदवी बहाल केली. त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.


2010 : कसाबला फाशी


मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील (Mumbai attack) एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला आजच्याच दिवशी म्हणजे 6 मे 2010 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली. 26 नोव्हेंबर 2011 रोजी मुंबईत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. हॉटेल ताज, ओबेरॉय आणि सीएसटीवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 166 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.