Majha Maha Katta: आपली दोन्ही मुलं निलेश राणे (Nilesh Rane) आणि नितेश राणे (Nitesh Rane) हे शिक्षण घेत असताना त्यांनी राजकारणात येऊ नये असं वाटत होतं, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी म्हटले. एबीपी माझाच्या 'माझा महाकट्टा' या विशेष कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे सुपुत्र डॉ. निलेश राणे, आमदार नितेश राणे यांनी संवाद साधला. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या वैयक्तिक आणि राजकीय कारकीर्दीतील संघर्षाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 'माझा महाकट्टा' मध्ये म्हटले की, निलेश आणि नितेश ही दोन्ही मुलं शिक्षण घेत असताना त्यांनी राजकारणात प्रवेश करू नये असे वाटत होते. त्यांनी शिक्षण पूर्ण करून आपला व्यवसाय सांभाळावा असं वाटतं होतं. दोन्ही मुलं कर्तृत्वान व्हावी अशी अपेक्षा होती. त्यांनी व्यवसाय, राजकारणात यश मिळवलं असे कौतुकोद्गार नारायण राणे यांनी काढले. राजकारणात निष्ठा, काम पाहून पदे- जबाबदारी दिली जात नाही. राजकारण बदलत चाललं आहे. राजकारणात मी बरेच काही सहन केलंय आणि पचवलं आहे. मात्र, मुलांच्या वाटेला हे येऊ नये यासाठी त्यांनी राजकारणापेक्षा व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे असे वाटत होते असेही नारायण राणे यांनी सांगितले. 


अनेक व्यवसाय...लहानपणापासून संघर्ष


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या बालपणातील संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. त्यांनी म्हटले की, मुंबईत असताना छोटे-मोठे व्यवसाय केले. त्यातून पैसे मिळवत होतो. अगदी फटाके विक्री सारखेही व्यवसाय केले असल्याचे राणे यांनी सांगितले. आपल्या आत्मचरित्रात ही लहानपणाच्या संघर्षाबाबत काहीच लिहीले नसल्याचे त्यांनी सांगितले. आयकर विभागात असताना माझे छोटे-मोठे व्यवसाय सुरू होते. वडिलांनी या व्यवसायातील एक पैसाही नको असे स्पष्ट सांगितले होते. त्यामुळे आयकर विभागातील नोकरीचा सगळा पगार गावी मनीऑर्डरने पाठवयाचो असे नारायण राणे यांनी म्हटले.  


संजय राऊतविरोधात आक्रमक भाषा


नारायण राणे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत कोणाची इज्जत ठेवत नाही. मग, आम्हीदेखील त्यांची इज्जत का ठेवावी असा उलट सवालही राणे यांनी केला. आम्ही इतर कोणाला काही बोलत नाही. फक्त राऊतांविरोधात आक्रमक का बोलतो, याचा विचार करा असे म्हणताना इतर नेत्यांवर अशी टीका करत नसल्याचे त्यांनी म्हटले. संजय राऊत म्हणजे आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका राणेंनी यांनी केली. पगारदार असलेल्या संपादकाने एवढी मालमत्ता कशी जमवली हे त्यांनी सांगाव असेही नारायण राणेंनी म्हटले. 




इतर महत्त्वाच्या बातम्या: