सोलापूर : गाडीचा हॉर्न वाजवल्याने बाप-लेकाला तिघा जणांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत बापाचा मृत्यू झाला. माढा तालुक्यातील सापटणे गावात ही घटना घडली असून, तिघांवरही माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी जोरात चालवून हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन मंगळवारी सायंकाळी गावातल्या तिघांनी मिळून 21 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण केली होती. आपल्या मुलाला होत असलेली मारहाण थांबवण्यासाठी मध्यस्थी करु पाहणाऱ्या वडिलांनाही या तिघांनी जबर मारहाण केली.

जखमी अवस्थेत दोघांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, गौतम नामदेव ओहोळ यांचा म्हणजे तरुणाच्या वडिलांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.

याबाबत माढा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरुन तिघांवर हत्येचा आणि अनुसूचित जातीजमाती अन्याय प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज पोलीस अधीक्षक यांना भेटून अन्यायग्रस्त कुटुंबाने न्याय देण्याची मागणी केल्यावर कारवाई करण्यात आली.

सोमनाथ एकनाथ लाड, हनुमंत एकनाथ लाड, बालाजी रघुनाथ सावंत यांच्या विरोधात हत्येचा आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.