मुंबई/धुळे : विशिष्ट रक्कम भरुन घेतलेलं स्मार्ट कार्डवर तुमच्यासह कुटुंबातील सदस्यांनाही प्रवास करता येणार आहे. ही सुविधा देणारी 'कॅशलेस स्मार्ट कार्ड' योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली.


या योजनेंतर्गत प्रवाशांना 50 रुपयांमध्ये स्मार्ट कार्ड दिलं जाईल. त्यावर सुरुवातीला किमान 500 रुपये भरणं आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम ही 100 च्या पटीत असेल. या योजनेचा लाभ प्रवाशांना येत्या महाराष्ट्र दिनापासून (1 मे, 2018 पासून) प्रत्येक आगारात जाऊन घेता येईल.

एसटीच्या प्रवासा सुट्ट्या पैशांवरुन वाद झालेलं अनेकदा पाहायला मिळतं. या सर्वातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्यानुसार ठराविक रकमेचं स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमे इतका एसटीचा कोणताही (साधी, रातराणी,हिरकणी, शिवशाही, शिवनेरी आणि अश्वमेध बस) प्रवास करणं आता प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची गरज नाही.

हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढलं तरी त्याच्या कुटुंबातील आणि मित्रांपैकी कुणीही प्रवासाला जाताना हे कार्ड वापरु शकतात. तसेच कितीही व्यक्तींची तिकीटे काढू शकतात. अर्थात, प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड नंतर रिचार्ज करावं लागेल.

दरम्यान आगारातून कार्ड घेतल्यानंतर घरबसल्याही कार्ड रिचार्ज करु शकता. या स्मार्ट कार्डमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर तर होईलच, शिवाय सुट्ट्या पैशावरुन वाहक आणि प्रवासी यांच्यातील हमरी-तुमरी आणि अनावश्यक वाद-विवाद देखील टाळले जाऊ शकतात.