सांगोला (सोलापूर) : शिक्षणाला वय नसतं. माणूस आयुष्यभर विद्यार्थीच राहतो, असे म्हणतात. याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कस्तुराबाई महामुनी.


कस्तुराबाईंचं लहानपणी बालविवाहामुळे पहिल्या इयत्तेपासूनच शिक्षण संपले आणि मागे लागला दुर्दैवाचा फेरा. दुसऱ्या इयत्तेत दाखल होताच त्यांचा बालविवाह करण्यात आला आणि खऱ्या अर्थाने नियतीने त्यांना एका पाठोपाठ धक्के देण्यास सुरुवात केली.

वयाच्या 11 व्या वर्षी आई-वडिलांचं छत्र हरवलें. त्यानंतर एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिल्यावर आयुष्यात आनंदाचे क्षण येण्यास सुरुवात झाली. मात्र दुर्दैव पाठ सोडायला तयार नव्हतं. वयाच्या 18 व्या वर्षी कस्तुराबाई याना वैधव्य आलं.

संपूर्ण आयुष्य कोसळल्याच्या भावना असताना त्यांनी मुलांसाठी जिद्द बांधली आणि सुरु झाली नियतीशी दोन हात करण्याची लढाई.

...आणि नापासांची शाळा गाठली !

अतिशय कठोर कष्ट आणि जिद्दीतून त्यांनी मुलाला पदवीधर केलं. मुलीलाही शिकविलं. दोघांची लग्न लावून दिली. आता दोघेही सुखाने संसार करत आहेत. पण लढण्याची जिद्द कस्तुराबाई यांनी सोडली नाही. त्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करू लागल्या. नातवंडे इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिकू लागली. पण आता त्यांना आपल्या अल्प शिक्षणामुळे आपल्याला आयुष्यात कोणतीच प्रगती न करता आल्याची खंत बोचत होती. शिक्षण घेतल्यास अंगणवाडीत मदतनीसच्या ऐवजी सेविका बनण्याचे त्यांनी ठरवले. मात्र याला दहावी पास असणे आवश्यक असल्याने मुले आणि नातवंडांच्या प्रेरणेतून कस्तुराबाई यांनी गाठली पंढरपूर येथील नापासांची शाळा.

या शाळेत शिक्षण घेत यंदा दहावीचा फॉर्म भरला आणि आता त्या नियमितपणे सांगोल्यातून परीक्षा देण्यासाठी पंढरपूरमध्ये येऊ लागल्या आहेत.

वयाची साठी ओलांडल्यानंतर संसाराचे पाश तोडून महिला पोथ्या-पुराणे आणि देवाच्या नामस्मरणात आयुष्य व्यतीत करीत असतात. मात्र 61 व्या वर्षी देखील कस्तुराबाई दहावीचा जोरदार अभ्यास करण्याच्या मागे लागल्या आहेत.

दहावीचे इंग्रजी, शास्त्र, गणित हे विषय या वयात समजून घेणे खूपच कठीण असले, तरी मनातील शिक्षण घेण्याची उर्मी आणि जिद्द या सर्व अडचणींवर मात करून त्यांना अभ्यासासाठी अधिक सजग बनवत आहे.

आपल्या नातीपेक्षाही लहान मुला-मुलींच्या सोबत पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रावर येताना त्यांना कसलाच कमीपणा वाटत नाही. उलट पेपर संपल्यावर नापासांच्या शाळेतील शिक्षक भैय्या सर यांच्याकडून आपले काही चुकले का, याची तपासणी देखील या आजीबाई तेवढ्याच उत्साहाने करून घेत असतात.

नापासांच्या शाळेमुळे कस्तुराबाई यांच्यासारख्या कितीतरी शिक्षणापासून दूर गेलेल्या लोकांना मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग गवसला असून, आज या शाळेत नियतीच्या फेऱ्यांमुळे बाजूला फेकल्या गेलेल्या त्यांच्या सारख्या कितीतरी वयस्कर पुन्हा शिक्षणाच्या ओढीने अशा परीक्षा देताना दिसत आहेत.

जिद्द आणि उमेद असेल तर चांगल्या कामासाठी वयाची बंधनेही गाळून पडतात आणि 61 व्या वर्षी देखील कस्तुराबाई यांच्या सारख्यांना आपल्या आयुष्याचे ध्येय आणि समाधान गाठता येते.