'मेडिकलऐवजी आपण इंजिनिअरिंगच घ्यायला पाहिजे होतं. मी दोन्ही कोर्सेससाठी पात्र ठरलो होतो.' असं डॉ. महामुनकर म्हणाले. धुळ्यात मारहाण झाल्यानंतर डॉक्टर मुंबईत परतले आहेत. डोळ्याच्या दुखापतीबाबत जेजे हॉस्पिटलचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांची भेट ते घेणार आहेत.
आपल्या आईने रुग्णालयांत क्लेरिकल काम केलं होतं. तिनेच इंजिनिअरिंग ऐवजी मेडिकल घेण्याचा आग्रह केला होता. मात्र रविवारच्या घटनेनंतर तिनेच सगळ्यात आधी दिलगिरी व्यक्त केली, असं डॉ. महामुनकर सांगतात.
डॉ. महामुनकरांचं ब्रेन स्कॅनिंग केल्यानंतर डाव्या डोळ्यात फ्रॅक्चर झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे ऑप्टिक नर्व्हवर परिणाम होऊन दृष्टी जाण्याची भीती असल्याचं डॉ. लहानेंनी सांगितलं.
'रविवारी रात्री काय झालं ते नेमकं आठवत नाही. अनेक जणांनी माझ्यावर हल्ला केला. माझे दोन मोबाईल घेऊन त्याचे तुकडे केले.' असं डॉ. महामुनकर सांगतात. के. जे. सोमय्या मेडिकल कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात ऑर्थोपेडिक्स विषयातून डॉ. रोहन महामुनकरांनी डीएनबी पूर्ण केलं. त्यानंतर धुळ्यात वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून ते रुजू झाले.
ग्रामीण भागाचा अनुभव मला घ्यायचा होता, पण मी आणि माझ्या पालकांनी आयुष्यातला सर्वात वाईट अनुभव घेतला, असं ते म्हणतात. मूळ मुंबईतल्या कांदिवलीचे रहिवासी असलेल्या डॉ. महामुनकरांना धुळ्यापासून शक्य तितकं लांबच राहायचं आहे.
काय आहे प्रकरण?
धुळे शहरातील साक्री रोडवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉ. महामुनकर यांनी या रुग्णाला न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचे सांगितलं. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने उपचाराअभावी शत्रुघ्नचा मृत्यू झाला आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉ. महामुनकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यात डॉ. रोहन महामुनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त होत आहे. आयएमएनेही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
संशयिताचा गळफास
धुळ्यातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील संशयित आरोपीने पोलिस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रदीप सदाशिव वेताळ असं आत्महत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
धुळे शहर पोलिस स्टेशनच्या लॉकअपमध्ये असलेल्या बाथरुममध्ये प्रदीप वेताळने गळफास घेतला. पोलिस कोठडीतच आरोपीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.