6 November On This Day : प्रत्येक दिवस हा इतिहासातील अनेक महत्त्वांच्या घटनांचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशीदेखील इतिहासात महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी अब्राहम लिंकन यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली. तर, महात्मा गांधी यांना दक्षिण आफ्रिकेत वर्णभेदाविरोधातील आंदोलनासाठी अटक करण्यात आली. आपल्या अभिनयाने छाप सोडणारे अभिनेते संजीव कुमार यांचा आज स्मृतीदिन आहे.
1860 : अब्राहन लिंकन अमेरिकेचे 16 वे राष्ट्राध्यक्ष
अब्राहम लिंकन आजच्याच दिवशी 1860 मध्ये अमेरिकेचे 16 वे अध्यक्ष म्हणून निवडले गेले होते. तर रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असणारे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकन गृहयुद्धाच्या काळात त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलेय. अब्राहम लिंकन यांचे विचार आजच्या आधुनिक युगातही लागू होतात.
1913 : दक्षिण आफ्रिकामध्ये महात्मा गांधींना अटक
महात्मा गांधी यांनी सहा नोव्हेंबर 1913 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेद धोरणांविरूद्ध आंदोलनं केले होते. ‘द ग्रेट मार्च’ याचे नेतृत्व महत्मा गांधी यांनी केले होते. येथील भारतीय खाण कामगारांच्या मोर्चाचे नेतृत्व करण्यासाठी 1913 मध्ये महात्मा गांधी यांना अटक करण्यात आली होती. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत तब्बल 21 वर्षे राहिले होते. गांधीजींच्या सत्याग्रह या विचारांची सुरुवातही दक्षिण आफ्रिकेतून झाली.
1954 : 'मुंबई वीज मंडळ' स्थापन
मुंबई राज्यात 'मुंबई वीज मंडळ' 6 नोव्हेंबर 1954 रोजी स्थापन करण्यात आले. या मंडळांवर वीजनिर्मिती, पुरवठा व वितरण यांची जबाबदारी होती. भारतामध्ये 1932 पर्यंत वीज पुरवठा म्हैसूर संस्थान वगळता खाजगी उत्पादकांकडून होत होती. 1933 मध्ये मद्रास व पंजाब प्रांत शासनांनी प्रत्येकी एक वीज उत्पादन केंद्र उभारले. त्यानंतर इतर प्रांत शासनांनी त्यांचे अनुकरण केले. ही केंद्रे शासने खात्यांद्वारा चालवीत व खाजगी उत्पादकांना परवाने घेऊन वीज केंद्रे उभारत होती. वीजेचे दर शासननियंत्रित होते.
1985 : अभिनेते संजीव कुमार यांचे निधन
संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला हरी जरीवाला यांचा आज स्मृतीदिन. 1960 मधील 'हम हिंदुस्तानी' या हिंदी चित्रपटाद्वारे संजीव कुमार यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. संजीव कुमार यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. मुंबईतल्या इप्टा (Indian People's Theatre Association)द्वारा त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. रंगभूमीवरील कलाकार असल्याने त्यांच्याकडे विविध भूमिका साकारण्याचे कौशल्य होते. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी आर्थर मिलरच्या 'ऑल माय सन्स'च्या हिंदी रूपांतरित नाटकात एका म्हाताऱ्याची भूमिका केली. ए.के. हंगल दिग्दर्शित 'डमरू' नाटकात संजीव कुमार याची सहा मुले असलेल्या 60 वर्षांच्या वृद्धाची भूमिका होती. आँधी, खिलौना (1970), मनचली (1975), शोले (1975), अंगूर (1981), नमकीन (1982) इत्यादी लोकप्रिय चित्रपटांत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या.
2012 : ओबामा यांची दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड
बराक ओबामा 6 नोव्हेंबर 2012 रोजी अमेरिकेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष म्हणून निवडून आले. 2008 पासून 2012 पर्यंत त्यांनी पहिल्या टर्ममध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिलं होतं. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते.
2013 : सचिन तेंडुलकरला भारतरत्न जाहीर
दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याला भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारी सचिन तेंडुलकर ही पहिलीच व्यक्ती. सचिनसोबत वैज्ञानिक प्रो.सी. एन. आर. राव यांना ‘भारतरत्न’ म्हणून घोषित करण्यात आले. दोघांनी आपल्या क्षेत्रात सर्वोच्च कार्य केले होते. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यानंतर वाद निर्माण झाला होता.
इतर महत्त्वाच्या घडामोडी
1888 - महात्मा गांधी यांनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडनमध्ये प्रवेश घेतला.
1814- सेक्सोफोन वाद्याचे जनक अॅडोल्प सॅक्स यांचा जन्म
1861 - बास्कोटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म
1880 - निसान कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म
1912 - भारत या पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
1996 - अर्जेंटिनाचे गांधी म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2001- डीआरडीओचे महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना नायडुम्मा स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.