5th July Headline : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याकडील खासदारांची संख्या मात्र स्पष्ट झाली नाही. पण बुधवारी होणाऱ्या बैठकीत अजित पवार त्यांच्याकडील खासदारांची संख्या स्पष्ट करणार आहेत. बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दोन दिवसांच्या महराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर शिवसेनेप्रमाणे शरद पवारही राष्ट्रवादी पक्षाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेणार आहेत. 


राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांचा महाराष्ट्र दौरा 


 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. तसेच त्या गोंडवाना विद्यापीठाच्या 10 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणार आहेत. नागपूर मधील कोराडी येथील भारतीय विद्या भवनाच्या सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपतींच्या या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.


शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीची बैठक घेणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व प्रदेश पदाधिकारी, फ्रंटल सेल अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुकास्तरावरील सर्व फ्रंटल सेलच्या सदस्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीचा व्हीप जितेंद्र आव्हाड यांनी जारी केला आहे. 


अजित पवारही घेणार बैठक


पक्षातून बंड केल्यानंतर अजित पवारांनी आज सर्व आमदार, खासदारांना बैठकीला बोलवलं आहे.या बैठकीनंतर अजित पवार यांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या बैठकीचा व्हिप प्रतोद अनिल पाटील यांनी जारी केला आहे. 



मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलावली शिवसेना आमदारांची बैठक


अजित पवार सरकार मध्ये सामिल झाल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर असल्याच्या चर्चा सध्या आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली आहे. 


उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन 


आमदार आणि खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे माजी आमदारांची बैठक घेणार आहेत. ही बैठक मातोश्रीवर बोलावण्यात आली आहे.


राज्यात मान्सूनचा इशारा


राज्यात पुढील काही चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तर पालघर, जालना, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अर्लट देण्यात आला आहे.