भिवंडी, मालेगाव आणि पनवेल महापालिकेसाठी 55 टक्के मतदान
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2017 08:21 PM (IST)

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : भिवंडी- निजामपूर, मालेगाव आणि पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 55 टक्के, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी सरासरी 73.4 टक्के, तर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 42 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली. भिवंडी- निजापूर महानगरपालिकेसाठी 53, मालेगाव महानगरपालिकेसाठी 60, तर पनवेल महानगरपालिकेसाठी 53 टक्के मतदान झालं. नागभीड (जि. चंद्रपूर) नगरपरिषदेसाठी 71.5, नेवासा (जि. अहमदनगर) नगरपंचायतीसाठी 81.4, रेणापूर (जि. लातूर) नगरपंचायतीसाठी 76.7; तर शिराळा (जि. सांगली) नगरपंचायतीसाठी 87.5 टक्के, असं एकूण सरासरी 77.9 टक्के मतदान झालं. याशिवाय जव्हार, श्रीवर्धन, चिपळूण, कसई-दोडामार्ग, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु., औसा आणि अचलपूर या 7 नगरपरिषद/ नगरपंचायतींतील एकूण 11 रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी सरासरी 61 टक्के मतदान झालं. नगरपरिषदा आणि नगरपरिषदांच्या सार्वत्रिक आणि पोट निवडणुकांसाठी एकत्रित सरासरी 73.4 टक्के मतदान झालं. त्याचबरोबर धारणी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीदेखील मतदान प्रक्रिया पार पडली. 26 मे रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.