मुंबई: नोटबंदीनंतर अवघ्या 4 दिवसात राज्यातील जिल्हा बँकांमध्ये तब्बल 5 हजार कोटी जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या आणि बहुतेक शेतकरी ग्राहक असणाऱ्या या बँकांमध्ये एवढा पैसा नेमका आला कुठून? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता नाबार्डनं चौकशी सुरु केली आहे.


पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यानंतर 10 ते 14 नोव्हेंबरदरम्यान हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या. त्यामुळे 15 नोव्हेंबर रोजी आरबीआयच्या वतीने जिल्हा बँकांवर निर्बंध घालण्यात आले.

नाबार्डच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँकांमधील काही खात्यांची पडताळणी केली असता, त्या खात्यांवर नोटाबंदीनंतर अधिक पैसे डिपॉझिट झाल्याचे आढळून आले. जर एखाद्या खातेदाराच्या खात्यावर पूर्वी काही हजार रुपयेच जमा असतील, अन् एक लाख भरण्याची मुदत असताना अचानक त्यापेक्षा अधिक रक्कम जमा झाली असेल, तर हे पैसे नेमके आले कुठून यांची तपासणी केली जात आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इस्लामपूर, शिराळा आणि तासगाव शाखेत असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सांगली बँकेकडे सध्या 320 कोटी रुपये जमा झाले असून त्यामध्ये सर्वाधिक जुन्या नोटांचा समावेश आहे. तर याच कालावधीमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत 600 कोटी रुपये जमा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

वास्तविक, राज्यातील जिल्हा बँकांचे जाळे ग्रामीण भागात विस्तारलेले आहे. या बँकांचे जवळपास 89 ते 90 लाख खातेदार आहेत. मात्र या सर्व बँकांवर राजकीय व्यक्तींचेच वर्चस्व आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आरबीआयने जिल्हा बँकांवर निर्बंध घातल्यानंतर बँकांनी न्यायालयात धाव घेतली होती. शिवाय यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनही करण्यात आले होते.