4th August In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. या दिवसात काही महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या असतात. आजच्या दिवशी भाभा अणुकेंद्रात 'अप्सरा' ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली होती. मुंबई महापालिकेचे जनक समजले जाणारे सर फिरोजशहा मेहता यांचा जन्मदिन आज आहे. सिनेसृष्टीत आपली अजरामर छाप सोडणारे गायक-अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते किशोर कुमार यांचा जन्मदिनही आज आहे. लेबनॉनची राजधानी बैरूतमधील बंदरात भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाने संपूर्ण देश कोलमडला होता. 



1730: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. 


नी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व करणारे सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. सदाशिवराव हे नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ होते. निजामाविरुद्धच्या लढाईत सदाशिवराव यांनी आपले नेतृत्व दाखवून दिले. निजामाचा पराभव करून त्यांनी दौलताबादचा किल्ला सर केला. सदाशिवराव भाऊ यांनी निजामाकडून इब्राहिम खान गारदी याला मागून घेतले. सदाशिवराव यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व केले. या लढाईत मराठ्यांचा पराभव झाला. सदाशिवरावभाऊही या लढाईत मारले गेले असल्याचे समजले जाते. 



1845: मुंबई महापालिकेचे जनक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म 


मुंबई महापालिकेचे जनक म्हणून ओळखले जाणारे सर फिरोजशहा मेहता यांचा आज जन्मदिन. फिरोजशहा मेहता हे भारतीय राष्ट्रीय सभेच्या (Indian National Congress) संस्थापकांपैकी एक आहेत. फिरोझशहांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे सर्व शिक्षण आणि बहुतेक राजकीय जीवन मुंबईतच व्यतीत झाले. एल्फिन्स्टन कॉलेजमधून एम्.ए. होऊन ते इंग्लंडला बॅरिस्टर होण्यासाठी गेले. तेथील चार वर्षांच्या वास्तव्यात त्यांच्यावर दादाभाई नौरोजींचा प्रभाव पडला. भारतात आल्यानंतर 1869 साली त्यांनी दादाभाईंच्या ईस्ट इंडिया असोसिएशनची शाखा म्हणून बाँबे असोसिएशन मुंबईत सुरू केली. गोऱ्या लोकांच्या मिरासदारीविरुद्ध त्यांनी प्रभावी प्रचार केला. सुरतच्या आंदोलनातून उद्‌भवलेल्या दंगल केसमध्ये आरोपींच्या वतीने समर्थपणे उभे राहून फिरोझशहांनी कीर्ती मिळविली. विविध प्रश्न हाती घेऊन त्यांनी वकिलीबरोबर राष्ट्रीय जागृतीचेही कार्य केले. 


1872 च्या मुंबई महानगरपालिका विधायक कायद्यावर फिरोझशहांच्या सूचनांची पूर्ण छाप होती. यामुळे त्यांना ‘मुंबईतील नागरी शासनाचे जनक’ अशी ओळख मिळाली. 1873 मध्ये त्यांना मुंबईचे आयुक्त करण्यात आले होते. 


1884-85 या दरम्यान फिरोझशहांची मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. बाँबे असोसिएशनचे बाँबे प्रेसिडेन्सी असोसिएशनमध्ये रूपांतर झाले (१८८५), त्यावेळी तिचे फिरोझशहा, न्यायमूर्ती तेलंग आणि दिनशा वाच्छा हे पहिले सरचिटणीस झाले. याच वर्षी मुंबईस भरलेल्या पहिल्या काँग्रेस अधिवेशनात फिरोझशहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिरिरीने भाग घेतला. त्यांची राष्ट्रीय नेत्यांमध्ये गणना होऊ लागली.


1878 ते 1880 या तीन वर्षांत वृत्तपत्रांची गळचेपी करणारा व्हरॅ्‌नक्युलर प्रेस ॲक्ट आणि ब्रिटिश कापडाला हुकमी बाजारपेठ चालू राहावी, यासाठी आयातकरातून देण्यात आलेली सूट, या दोन प्रश्नांवर फिरोझशहांनी सनदशीर मार्गांचा अवलंब केला.


1890 मध्ये काँग्रेसच्या सहाव्या अधिवेशनासाठी फिरोझशहा मेहतांची अध्यक्षपदी निवड झाली. तत्पूर्वी 1886 मध्ये मुंबईच्या कायदेमंडळाचे ते सदस्य झाले होते. पुढे ते इंपीरियल कौन्सिलचे सदस्य म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्तता करण्यासाठी विविध उपाय सुचविले तसेच लष्करी व शासकीय खर्चात कपात करावी, यासाठी आग्रह धरला. कर्झनच्या युनिव्हर्सिटी बिलाला त्यांनी कडाडून विरोध केला. विश्वविद्यालये स्वायत्त असावीत, त्यांवर शासकीय दडपण असू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. 


सर फिरोजशहा यांच्या पुढाकाराने 1911 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. 1913 मध्ये बाँबे क्रॉनिकल हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईला सुरू केले होते. 



1894: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचा जन्म


मराठी साहित्य विश्वातील नावाजलेले लेखक ना. सी. फडके यांचा आज जन्मदिन. ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. अल्ला हो अकबर! (1917) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (1962) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. त्यांच्या काही कादंबऱ्यांचे आणि कथांचे इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांतून अनुवादही झालेले आहेत.


1940 मध्ये रत्नागिरीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. साहित्य जगतातील योगदानासाठी त्यांना भारत सरकारने 1962 साली 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित केले. 



1929 : गायक-अभिनेता-निर्माता-दिग्दर्शक किशोर कुमार यांचा जन्म


पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक या सिनेमातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपला अजरामर ठसा उमटवणाऱ्या किशोर कुमार यांचा आज जन्मदिन. बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये  किशोर कुमार यांनी पार्श्वगायन केले आहे. किशोर कुमार यांचा जन्म मध्य प्रदेशातील खांडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले.  अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार ही त्यांची भावंडे होते. किशोर कुमार हे सगळ्यात धाकटे होते. 



आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकीर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूहगायक म्हणून काम करीत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (1946) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआए क्यों मांगू.. यानंतर किशोर कुमार यांना गाण्याच्या बऱ्याच संधी मिळाल्या.


गाण्यात मन रमणाऱ्या किशोर कुमार यांना गायक व्हायचे होते. मात्र, वडील बंधू अशोककुमार यांच्या आदरयुक्त भीतीमुळे त्यांनी काही काळ चित्रपटांमध्ये अभिनय केला. किशोर कुमार यांच्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये लडकी (1953), नौकरी (1954), बाप रे बाप (1955), पैसा हाय पैसा (1956), नई दिल्ली (1956), नया अंदाज, भागम भाग, भाई भाई (1956) , आशा (1957), चलती का नाम गाडी (1958), दिल्ली का ठग, जलसाझ, बॉम्बे का चोर, झुमरू, हाफ तिकीट,  मिस्टर एक्स इन बॉम्बे  पडोसन (1968) आदी चित्रपटांचा समावेश होतो. 


किशोर कुमार यांनी संगीत शिकले नव्हते. ते के.एल. सैगल यांची नक्कल करत असे.  संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली. 


1968 मधील पडोसन चित्रपटात संगीतकार राहुल देव बर्मन यांनी  किशोर कुमार यांना संधी दिली. किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. 


1969 मध्ये शक्ती सामंताने 'आराधना'ची निर्मिती व दिग्दर्शन केले. किशोर कुमार यांनी या  चित्रपटात तीन गाणी गायली; "मेरे सपोनों की रानी", "कोरा कागज था ये मन मेरा" आणि "रूप तेरा मस्ताना". जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कुमारच्या तीन गाण्यांनी त्याला बॉलिवूडचा अग्रगण्य पार्श्वगायक म्हणून ओळख मिळवून दिली. त्यानंतर किशोर कुमार यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 


1970 आणि 1980 च्या दशकापासून किशोर कुमार यांनी धर्मेंद्र, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, जीतेंद्र, संजीव कुमार, देव आनंद, शशी कपूर, मिथुन चक्रवर्ती, विनोद खन्ना, दिलीप कुमार, शम्मी कपूर, रणधीर कपूर, ऋषी कपूर, राजीव कपूर, आदित्य पंचोली, नसीरुद्दीन शाह, संजय दत्त, सनी देओल, अनिल कपूर, राकेश रोशन, प्राण, सचिन, विनोद मेहरा, रजनीकांत, चंकी पांडे, कुमार गौरव, संजय खान, फिरोज खान, कुणाल गोस्वामी, गोविंदा आणि जॅकी श्रॉफ अशा विविध अभिनेत्यांसाठी पार्श्वगायन केले. किशोर कुमार यांनी सर्वाधिक पार्श्वगायन राजेश खन्ना यांच्यासाठी केले होते. किशोर कुमार यांनी  राजेश खन्नासाठी 245, जीतेंद्रसाठी 202, देव आनंदसाठी 119 आणि अमिताभसाठी 131 गाणी गायली आहेत.


किशोर कुमार यांना सर्वोत्कृष्ट पुरुष पार्श्वगायकाचा 8 वेळेस फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांना 28 नामांकने मिळाली होती. त्या श्रेणीतील सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कार जिंकण्याचा आणि नामांकन मिळण्याचा विक्रम त्यांच्याकडे आहे. 



2001 : भारतातील पहिली स्किन बॅंक मुंबईत स्थापन 


मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली. यामुळे आगीत होरपळेले  आणि इतर आजार, अपघातातील जखमींवर उपचार करताना मोठी मदत झाली. 



2020 : लेबनॉन देशाची राजधानी बेरूतमध्ये भीषण स्फोट; 200 हून अधिक ठार, तीन लाख नागरीक विस्थापित


लेबनानची राजधानी असललेल्या बैरुतमध्ये संध्याकाळच्या सुमारास दोन भीषण स्फोट झाले. बंदराजवळील गोदामात असलेले 2750 टन अमोनियम नायट्रेटच्या झालेल्या स्फोटाने लेबनानची राजधानी बैरूत हादरली. बेरूतचे बंदर आणि परिसर पूर्णपणे उद्धवस्त झाले होते. या स्फोटामुळे संपूर्ण जग हादरले होते. बंदर परिसरात मृतदेहांचा खच पडला आहे. सगळीकडे उद्धवस्त झालेल्या इमारती, मातीचा ढिग, स्फोटामुळे चक्काचूर झालेल्या कार व इतर वाहने असे सगळे भयावह दृष्य समोर आले. स्फोटाचे आवाज आणि तीव्रता पाहता याची तुलना लोकांनी अणूबॉम्बच्या स्फोटाशी केली. स्फोटामुळे जमिन हादरली. त्यामुळे भूकंप आल्याचा भास अनेकांना झाला.


बंदरावर स्फोट झाल्यानंतर जमिनीवर मृतदेहांचा खच पडला. जखमी झालेल्या नागरिकांचा आक्रोश सुरू होता. गंभीर जखमी झालेले मदतीची याचना करत होते. तर, कोणी स्वत: जखमी असून इतरांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र होते. या परिसरातील गगनचुंबी इमारती क्षणात जमीनदोस्त झाल्या. बैरुतमधील स्फोटानंतर लेबनॉनला संपूर्ण जगातून मदतीचा हात देण्यात आला. अनेक देशांनी आपली मदत आणि बचाव कार्य करणारी पथके, वैद्यकीय साहाय्येसह पाठवली होती. 


इतर महत्त्वाच्या घटना : 


1864 : ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म
1863 : पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्म.
1931: राज्याचे 10 वे मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील यांचा जन्मदिन
1956 : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.
1961 : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा जन्म. ओबामा हे अमेरिकेचे 44 वे राष्ट्राध्यक्ष असून त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कारही देण्यात आला आहे.