काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या, भाजप जिल्हा सरचिटणीसावर गुन्हा
एबीपी माझा वेब टीम | 23 Aug 2016 07:34 AM (IST)
शिर्डी : राजकीय वादातून 24 वर्षीय तरुणाची हत्या केल्याप्रकरणी शिर्डीत भाजपच्या जिल्हा सरचिटणीसावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन कापसेंवर राहता पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. भाजपचं काम सोडल्याच्या रागातून काँग्रेस कार्यकर्ता अविनाश कापसेवर चाकू हल्ला करण्यात आला होता. राहता तालुक्यातील पिंपळस गावात घडलेल्या घटनेत काँग्रेस कार्यकर्ता अविनाश कापसेचा मृत्यू झाला, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे यांच्यासह 14 जणांवर राहता पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून नितीन कापसे अजूनही फरार आहेत. दरम्यान हल्लेखोरांना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयत अविनाश कापसेच्या नातेवाईकांनी घेतला आहे. तर आरोपींना अटक करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नगर-मनमाड महामार्गावर राहता शहरात रस्तारोको केला आहे.