पालघर : देशात अनेक भागाला मार्चनंतर दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असून याला आता कोकणही अपवाद राहिलं नाही. शासनाकडून अनेक उपाययोजना सुरु केल्या जातात त्या बंदही पडतात. मात्र पालघरमधील तारापूर जवळील कुडण येथे लोकसहभागातून तब्बल 39 एकरवर दीड किलोमीटर लांबीचा तलाव तयार करण्यात आला आहे. या तलावामुळे या परिसरातील नागरिकांसह, प्राण्यांची,पक्ष्यांचीही तहान भागवण्यास मोठी मदत होत आहे.
पालघर जिल्ह्यातील तारापूर अणुशक्ती केंद्राच्या बाजूलाच असलेल कुडण गाव याच गावाच्या बाजूला खारटण जमीन. एरवी या जमिनीत समुद्राच्या भरतीचे पाणी शिरत असल्याने खारटण असल्याने काहीही उपयोग होत नव्हता. तर आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचे दुर्भिक्ष जाणवत होतं, मात्र हेच पाण्याचे दुर्भिक्ष कमी करण्यासाठी या भागातील सामाजिक काम करणारी लोक धावून आली. यामध्ये लायन्स क्लब तारापूर आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून 39 एकरवर गोड्या पाण्याच्या तलावाची निर्मिती करण्याचा विचार झाला आणि 2017 साली सुरु झालेल काम सध्या पूर्णत्वास आलं आहे.
गोड्या पाण्याचा हा तलाव साकार करण्यासाठी अनेकांचे हात कामी आले. यामध्ये लायन्स क्लब तारापूर सह स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी यांचा सहभाग लाभला. हा 39 एकरावरील दीड किलोमीटर लांबीचा लोकसहभागातून तयार करण्यात आलेला तलाव पूर्णत्वास आणण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा कालावधी लागला असून 26 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.
तर हा तलाव तयार झाल्याने आजुबाजूच्या दोन किलोमीटर परिसरातील 10 ते 12 गावांना फायदा होत असून भूजलपातळी वाढल्याने या भागातील बोरिंग, विहिरींना पाण्याचा चांगला सोर्स निर्माण झाला आहे. इतकंच नव्हे तर या तलावाचा विस्तार मोठा असल्याने येथे देशी परदेशी पक्षांचे विलोभनीय दृष्य ही नजरेस पडतं. तर गुरंढोरही याच पाण्यावर आपली तहान भागवताना पाहायला मिळतात. तर नागरिकांना रोजच्या वापराचा पाणीप्रश्न सुटला असून या पट्ट्यात बागायतदारांना या तलावाचा चांगलाच फायदा झाला असून कधीकाळी ओस टाकावी लागणारी जमीन ओलीताखाली आली आहे.
जलयुक्तशिवार योजना मागेल त्याला शेत तळं तसेच शासनाच्या विविध योजना या भूजल पातळी वाढवण्यात अपयशी ठरत असताना कुडण गावांत लोकसहभागातून तयार करण्यात आलेला श्रीकृष्ण तलाव हा उपक्रम अनेक गावांची तहान भागवण्यात यशस्वी ठरतोय. त्यामुळे या तलावाप्रमाणे राज्य शासनाने आपल्या उपाययोजना तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचा आहे.