सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाऱ्या शाळीग्राम दगडापासून भवानी मातेची मूर्ती बनवून प्रतापगडावर तिची 1661 साली स्थापना केली. या घटनेला आज 357 वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने गडावर 357 मशाली पेटविण्यात आल्या. प्रत्येक वर्षी या मशालींमध्ये एका मशालीची वाढ होते.


सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असलेला प्रतापगड किल्ला अफजल खानाचा वध आणि अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत.

मशाल महोत्सवासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी दाखल होतात. नवरात्रातील चतुर्थीच्या दिवशी मशाली पेटविण्याची ही परंपरा सुरु असताना हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या ठिकाणी मोठ्या संखेने हजेरी लावतात.

यंदाच्या मशालींचा आकडा 357 झाला. या मशालींनी नुसता हा प्रतापगडच उजळला नाही तर यातून शिवरायांच्या यशोगाथांनाही उजाळा दिला.