पालघर : पालघर जिल्ह्यात कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची हत्या झाल्यानंतर कासा पोलिस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांची जिल्ह्यामध्ये अन्य ठिकाणी बदली करण्यात आली आहे.


16 एप्रिलच्या रात्री मुंबईहून गुजरातकडे निघालेल्या दोन साधू (महंत) व त्यांच्या वाहनचालकाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कासा पोलीस ठाण्यातील दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून या हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या सुमारे 400 ते 500 आरोपींपैकी पोलीसांनी आतापर्यंत 101 आरोपींना व 9 अल्पवयीन  पकडले आहे. इतर आरोपी हे जवळपास जंगलात व डोंगरामध्ये लपल्याची शक्यता असल्याने ड्रोनच्या मदतीने पोलिस तपास करीत आहेत.


दरम्यान कासा पोलिस ठाण्यात असलेल्या 35 कर्मचाऱ्यांची पालघरच्या पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यात इतरत्र बदली केली असल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना कासा पोलीस ठाण्यात पाठवण्यात येईल असे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


चोर समजून तिघांवर हल्ला


मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोहचले. मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ 10.30 वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले.मात्र, त्यानंतर जमाव अधिक आक्रमक झाला आणि गाडीबरोबर पोलिसांवरही हल्ला चढवला. या घटनेतून पोलीस कसेबसे बचावले, परंतु त्या तीन जणांची जमावाने पोलिसांच्या गाडीतच दगड, काठ्या, कोयत्याने वार करुन निर्घृण हत्या केली.


Palghar Mob Lynching | 'मी' त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण माझं ऐकलं नाही :सरपंच चित्रा चौधरी



संबंधित बातम्या :