31th May In History: भारताच्या इतिहासामध्ये आजच्या दिवसाला विशेष असं स्थान आहे. कारण आजच्याच दिवशी, 1921 रोजी महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्वजाची संकल्पना मांडली. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला तिरंगा हा लाल, पांढरा आणि हिरव्या रंगात होता. तसेच आजच्याच दिवशी इंदूरातील मराठा साम्राज्याच्या राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. यासह इतिहासातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे, 


1577: मुघल सम्राट जहांगीरची पत्नी नूरजहाँ यांचा जन्म


नूरजहाँ  म्हणजेच मेहरुन्निसा (Nur Jahan) ही मुघल सम्राट जहांगीरची सर्वात आवडती पत्नी होती. तत्कालीन सम्राट अकबराविरुद्ध बंड करून आग्र्याहून दूर असताना जहांगीर तिला भेटला. यानंतर जहांगीरचे वडील अकबर यांना हे कळले तेव्हा त्यांनी मेहरुन्निसा हिचे शेर अफगाणशी लग्न लावून दिले. काही काळानंतर सलीमने शेर अफगाणला मारले आणि स्वतः तिच्याशी लग्न केले.


1725 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म 


पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) यांचा जन्म 31 मे 1725 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या ठिकाणी झाला. मराठा सरदार मल्हारराव होळकर यांच्या त्या सून होत्या. पण अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या नियोजनबद्ध कारभाराने स्वतःची अशी स्वतंत्र्य ओळख निर्माण केली. इंदूरमधील मोठमोठे घाट आणि तिर्थस्थळांची बांधकामं ही त्यांच्या कामाची विशेष ओळख. 


अहिल्यादेवी होळकर यांनी देशभरात अनेक हिंदू मंदिरे आणि नदीघाट बांधले, त्यांचा जीर्णोद्धार केला. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक आणि परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांनी सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर, मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. 


अहिल्यादेवींनी वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव आणि गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले आणि कुंभेरीजवळ खंडेराव होळकरांच्या स्मरणार्थ छत्री बांधली. 


1921 : महात्मा गांधींनी तिरंगा ध्वजाची संकल्पना मांडली


महात्मा गांधींनी 31 मे 1921 रोजी राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्वजाची संकल्पना मांडली. तीन रंगात असलेल्या या ध्वजामध्ये वरती लाल, मध्यभागी पांढरा आणि खाली हिरव्या रंगाचा समावेश होता. मध्यभागी पांढऱ्या रंगात गांधीजींच्या चरख्याची प्रतिमा होती. गांधीवादी नेते पिंगली व्यंकय्या यांनी या ध्वजाची रचना तयार केली. नंतरच्या काळात या ध्वजाच्या रंगात बदल करण्यात आला. 


15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र होण्याच्या काही दिवस आधी, विशेष स्थापन केलेल्या संविधान सभेने नव्या तिरंगा ध्वजाला मान्यता दिली. त्यामध्ये भगवा, पांढरा आणि हिरव्या रंगाची रचना होती. फक्त चरख्याची जागा अशोक चक्राने घेतली जी कायद्याचे शाश्वत चाकाचे प्रतिनिधित्व करते 


1935: पाकिस्तानातील क्वेटा शहरात झालेल्या भीषण भूकंपामुळे 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.


1959: बौद्ध धर्मगुरु दलाई लामांना भारतात आश्रय देण्यात आला


बौद्ध धर्माचे गुरु दलाई लामा (Dalai Lama) यांना तिबेटमधून निर्वासित झाल्यानंतर 31 मे 1959 रोजी भारतात आश्रय देण्यात आला. दलाई लामा हे तिबेटी लोकांचे आध्यात्मिक गुरू आहेत आणि तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वात महत्वाच्या व्यक्तींपैकी एक मानले जातात. 'दलाई लामा' हे शीर्षक मंगोलियन शब्द 'दलाई' म्हणजे महासागर आणि तिबेटी शब्द 'लामा' म्हणजे गुरु, शिक्षक किंवा मार्गदर्शक यांचे संयोजन आहे. दलाई लामा हे तिबेटचे 14 वे धर्मगुरू असून त्यांचे मूळ नाव हे तेन्झिन ग्यात्सो असं आहे. त्यांचा जन्म 1935 मध्ये तिबेटमध्ये झाला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना दलाई लामा ही पदवी दिली गेली आणि 1950 मध्ये ते या पदावर विराजमान झाले. 1959 मध्ये, चिनी राजवटीविरुद्ध अयशस्वी बंड केल्यानंतर ते तिबेटमधून बाहेर पडले आणि तेव्हापासून ते भारतात वास्तव्य करत आहेत. 


1977: भारतीय लष्कराच्या तुकडीने प्रथमच कांचनजंगा या जगातील तिसर्‍या उंच पर्वत शिखरावर चढाई केली.


2008: जगातील सर्वात वेगवान धावपटू उसेन बोल्टने 9.72 सेकंदात 100 मीटर पूर्ण करून विश्वविक्रम केला.