सांगली : सप्तशृंगी गडावरील बोकडबळीची प्रथा बंद करण्याच्या निर्णयानंतर, आता सांगली जिल्ह्यातही पशूबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिरजेतील अंबाबाई मंदिरातही पशूबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय देवस्थान पंच कमिटीनं घेतला आहे.


मिरजेतील अंबाबाई मंदिरातही गेल्या 300 वर्षांपासून नवरात्रीच्या काळात अष्टमीच्या रात्री पशूबळीची परंपरा आहे. पण यंदापासून ही प्रथा बंद करण्याचा निर्णय मंदिर कमिटीनं घेतला आहे. पशूबळी ऐवजी कोहळा अर्पण करण्यात येणार आहे.



दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक देवींच्या मंदिरात नवरात्रीच्या काळात बळीची प्रथा आहे. त्याचेच अनुकरण मिरजेतील अंबाबाई मंदिरात झाल्याचे सांगितले जात आहे. ही प्रथा बंद व्हावी याबाबतची मागणी गेल्या अनेकवर्षांपासून होत होती. त्यानुसार मंदिर प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला आहे.

मिरजेतील अंबाबाई मंदिर हे सांगली जिल्ह्यातील जागृत देवस्थान म्हणून समजले जाते. अंबाबाई देवी ही तुळजापूरच्या भवानी मातेचंच रुप असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्रीच्या काळात दर्शनासाठी येथे मोठी गर्दी असते.

संबंधित बातम्या

सप्तश्रृंगी गडावर यंदापासून बोकडबळी प्रथेला बंदी