छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना भररस्त्यात 100 उठाबशांची शिक्षा
एबीपी माझा वेब टीम | 17 Sep 2017 12:58 PM (IST)
मौनी विद्यापीठ आणि बस स्थानकावर मुलींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंवर भुदरगड पोलिसांनी कारवाई केली.
कोल्हापूर : कोल्हापुरात महाविद्यालयीन विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंना पोलिसांनी बस स्थानक चौकात 100 उठाबशा काढायला लावल्या. कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे. याबाबत अनेक तक्रारी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्यतल्या भुदरगड पोलिसांनी रोडरोमिओंवर धडक कारवाई केली. भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या मौनी विद्यापीठ आणि बस स्थानकावर मुलींची छेड काढणाऱ्या 25 रोडरोमिओंवर भुदरगड पोलिसांनी कारवाई केली. 25 रोड रोमिओंना भर वस्तीत असणाऱ्या बस स्थानक चौकात 100 उठाबशा काढलायला लावल्या. या प्रकारामुळे रोडरोमिओंनी पोलिसांची धास्ती घेतली आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचं परिसरात कौतुक होत आहे.