2nd July In History: भारताच्या इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. आजच्याच दिवशी ब्रिटिशांनी कपटाने पराभव केलेल्या बंगालच्या शेवटचा नवाब सिराज-उद- दौलाची हत्या करण्यात आली होती. त्याचसोबत समाजवादी नेते आणि स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेरअली यांचं निधनही आजच्याच दिवशी 1950 साली झालं होतं. 


1306: अलाउद्दीन खिलजीने सिवानावर हल्ला केला.


1757: प्लासीच्या लढाईनंतर नवाब सिराज-उद- दौलाची हत्या


बंगालचा शेवटचा स्वतंत्र नवाब सिराज-उद-दौलाच्या (Siraj-Ud-Daulah) हत्येसह त्याच्या कारकिर्दीचा शेवट हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचा पाया मानला जातो. प्लासीच्या लढाईत (Battle of Plassey) नवाबाच्या सैन्याचा सेनापती मीर जाफरने विश्वासघात केला आणि 23 जून 1757 रोजी रॉबर्ट क्लाईव्हच्या नेतृत्वाखालील ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने बंगालच्या सैन्याचा पराभव केला. पराभवानंतर, जवाब सिराज-उद-दौला 2 जुलै 1757 रोजी पकडला गेला. ईस्ट इंडिया कंपनीशी झालेल्या करारानुसार मोहम्मद अली बेगने नवाबाचा वध केला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर जाफर यांच्यात सिराज-उद-दौलाच्या हत्येबाबत करार झाला होता. बंगालचा शेवटचा नवाब सिराज-उद-दौला यांची कबर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील खुशबाग येथे आहे.


1777: गुलामगिरी रद्द करणारा व्हरमाँट हा पहिला अमेरिकेचा प्रदेश बनला.


1843 : होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक डॉ. सॅम्यूअल हानेमान याचं निधन  
 
होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्म 10  एप्रिल 1755  रोजी जर्मनी मधील मिसेन या गावी झाला. डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांना सहा भाषा अवगत असल्यामुळे सुरुवातीच्या काळात त्यांनी वैद्यकीय पुस्तकांची भाषांतरे केली. 1779 मध्ये 'स्नायूवाताची कारणे व उपचार' या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी पदवी प्राप्त केली. 1780 ते 85 या काळात ते लेखनिक, वैद्यकीय चिटणीस अशी काम करत त्यांनी रसायन शास्त्रावरील पुस्तके भाषांतरित करत असतानाच त्यांनी सुप्रसिद्ध वाईन टेस्ट शोधून काढली आणि 'मर्क्युरीयस झोल्युबिलस हानिमान'नावाचं पाऱ्याचा संयुग देखील शोधलं.


1897: इटालियन शास्त्रज्ञ मार्कोनी यांना लंडनमध्ये रेडिओचे पेटंट मिळाले.


1950 : समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहेर अली यांचे निधन 


युसूफ मेहर अली (Yusuf Meherally) हे भारतातील युवक चळवळीचे नेते, उत्तम वक्ते आणि स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक होते. त्यांचे कुटुंब मूळचे गुजरातच्या कच्छ संस्थानातील. त्यांचे वडील व्यापारानिमित्त मुंबई आणि कलकत्ता या शहरात असायचे. यूसुफ यांचा जन्म मुंबईत झाला. पण त्यांचे प्राथमिक शिक्षण कलकत्यात झाले. नंतर त्यांनी सर्व शिक्षण मुंबईतच घेतले. विद्यार्थीदशेतच रस्पूट्यिन क्लब नावाची युवक संघटना मिनू मसानी, उपेंद्र देसाई, के एफ्. नरिमन आदी मित्रांच्या सहायाने त्यांनी स्थापन केली. एल्‌फिन्स्टन महाविद्यालयातून (मुंबई विद्यापीठ) त्यांनी पदवी घेतली. त्यानंतर ते एलएल्‌बी झाले पण त्यांच्या युवक चळवळीमुळे त्यांना वकिलीची सनद नाकारण्यात आली. तेव्हा त्यांनी बाँम्बे यूथ लीगची स्थापना केली. पुढे तिचेच रूपांतर बॉम्बे प्रेसिडेन्सी यूथ लीगमध्ये झाले. या लीगने काँग्रेसच्या ध्येयधोरणात बदल करण्याचे ठरवले आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. परिणामतः या लीगचे लोण साऱ्या देशभर पसरले. लीगच्या निवडक चारशे स्वयंसेवकांनी मेहरअलींच्या नेतृत्वाखाली मुंबई बंदरात सायमन कमिशनविरुद्ध निदर्शने केली. युसूफ मेहर अली यांचे निधन 2 जुलै 1950 रोजी झालं. 


1972: भारत पाकिस्तानमध्ये शिमला करारावर स्वाक्षरी


1971 च्या भारत-पाक युद्धानंतर, भारतातील शिमला (Shimla Agreement) येथे एक करार झाला. याला शिमला करार (Simla Agreement) म्हणतात. त्यात भारताकडून इंदिरा गांधी आणि पाकिस्तानच्या बाजूने झुल्फिकार अली भुट्टो यांचा समावेश होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डिसेंबर 1971 च्या लढाईनंतर या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानंतर बांग्लादेश पाकिस्तानपासून विभक्त होऊन स्वतंत्र देश झाला. 1971 च्या युद्धात 90 हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांनी त्यांचे लेफ्टनंट जनरल नियाझी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यापुढे शरणागती पत्करली होती. त्यानंतर पाकिस्तानने आपला पराभव मान्य केला होता. 


1983: स्वदेशी बनावटीच्या अणुऊर्जा केंद्राचे पहिले युनिट मद्रासजवळ कल्पक्कम येथे कार्यरत झाले.


1990: सौदी अरेबियातील मक्का-मीना येथे चेंगराचेंगरीत 1,426 हज यात्रेकरू मरण पावले.


2002: संपूर्ण भारतात हिपॅटायटीस सी चाचणी अनिवार्य करण्यात आली.


2004: छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाला युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने जागतिक वारसा स्थळ घोषित केले.