27th August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 आजच्या दिवशी संमत झाला, यासाठी केंद्र सरकारने अतोनात प्रयत्न केले होते. राज कपूर यांचा 'आवाज' म्हणून ओळख असणारे गायक मुकेश यांची आज पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी इतरही कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.
1972: वन्यजीव संरक्षण कायदा संमत
भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये आजच्या दिवशी संमत झाला आणि तो 9 सप्टेंबर 1972 रोजी लागू करण्यात आला. या कायद्याचा मुख्य उद्देश जंगल आणि वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं हा आहे. हा कायदा संमत करण्यात तत्कालीन पंतप्रधान सोनिया गांधी यांचा मोलाचा वाटा होता. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात आधी मुबलक असलेल्या वन्यजीवांचे नामशेष होणं अधोरेखित झाल्याने राष्ट्रीय पातळीवर वन्यजीवांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कायदा करणं आवश्यक झालं. प्राणी आणि पक्षांविषयी कायदे करण्याचा अधिकार राज्य सरकारांच्या अखत्यारीत असल्याने केंद्र सरकारला या विषयावर कायदे करण्यासाठी दोन किंवा अधिक राज्य सरकारांची संमती आवश्यक होती. 11 राज्यांनी संमती दिल्यामुळे ‘वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, 1972’ हा केंद्रीय कायदा संमत करणं शक्य झाले आणि संपूर्ण देशासाठी एक कायदा अस्तित्वात आला.
1976: राज कपूर यांचा 'आवाज' गायक मुकेश यांची पुण्यतिथी
बॉलिवूडमध्ये अगदी 50 च्या दशकापासून अजरामर झालेले प्रख्यात गायक म्हणजे मुकेश. मुकेश यांचं पूर्ण नाव मुकेश चंद माथुर. मुकेश यांचा जन्म 22 जुलै 1922 साली दिल्लीमध्ये झाला होता. आपल्या फिल्मी कारकिर्दीत त्यांनी 10 हजारांहून अधिक गीतांना आवाज दिला. ऊर्दू, पंजाबी, तमिळ, बंगाली, मराठी, गुजराती या भाषांतही त्यांनी गाणी गायली. अनुनासिक स्वर आणि गायकीत ओतप्रोत भरलेला ’दर्द’ ही त्यांच्या गायनशैलीची वैशिष्ट्यं होती.
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, क्या खूब लगती हो बड़ी सुंदर दिखती हो, एक प्यार का नगमा है, मेरा जूता है जापानी, चाँद सी महबूबा हो मेरी... कब ऐसा मैंने सोचा था... या गाण्यांसारखी अनेक गाणी आजही सहजच कित्येकांच्या ओठांवर येतात. मुकेश यांची ही आणि अशी शेकडो गाणी खूप गाजली.
राज कपूर यांचा 'आवाज' म्हणून त्यांची ओळख होती. गायक मुकेश यांच्या निधनामुळे आपण केवळ मित्रच नाही, तर अजून काय गमावलंय याबद्दलच्या भावना दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांनी व्यक्त केल्या होत्या. राज कपूरसाठी मुकेश खास होते...काही जणांसाठी ते 'राज कपूरचा आवाज' होते... मात्र राज कपूरसाठी मुकेश केवळ त्यांचा ऑनस्क्रीन आवाज नव्हते, दोघांचं नातं त्यापलीकडंच होतं. राज कपूर मुकेश यांना कायम 'मुकेश चंद' या पूर्ण नावानंच हाक मारायचे.
अमेरिकेतील डेट्रॉइटमध्ये 27 ऑगस्ट 1976 ला मुकेश यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राज कपूर हे कोलमडले. ते त्यावेळी पुण्याजवळ 'सत्यम शिवम सुंदरम'चं शूटिंग करत होते. मुकेश यांचं पार्थिव जेव्हा भारतात आणलं तेव्हा राज कपूर एअरपोर्टवर भरलेल्या डोळ्यांनी हजर होते. अमेरिकेला जाण्यापूर्वी मुकेश यांनी राज कपूर यांच्या 'सत्यम शिवम सुंदरम'साठीच शेवटचं गाणं रेकॉर्ड केलं होतं.
इतर महत्त्वाच्या घटना:
1781: मैसूर शासक हैदर अली यांनी ब्रिटीश सरकारच्या ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याशी पोल्लीलूर ची लढाई लढली.
1854: गणेश श्रीकृष्ण तथा ‘दादासाहेब’ खापर्डे यांचा जन्म – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्हाडचे नबाब’
1859 : प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि भारतात टाटा स्टील कंपनीचा पाया रचणारे टाटा समुहाचे प्रमुख दोराबजी टाटा यांचा जन्मदिन.
1910 : पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार, विचारवंत, संशोधक लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ‘गॅझेटियर्स’ चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व सेतुमाधवराव पगडी यांचा जन्मदिन.
1957: मलेशियाची राज्यघटना अंमलात आली.
1962: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने शुक्र ग्रहाची तपासणी करण्यासाठी Mariner 2 हे यान प्रक्षेपित केलं.
1966: वसंत कानेटकर लिखित, पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित 'अश्रूंची झाली फुले' या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग.
1972: मल्ल दिलीपसिंग राणा ऊर्फ ग्रेट खली यांचा जन्म.
1980: भारतीय अभिनेत्री नेहा धुपिया यांचा जन्म.
1999 : सोनाली बॅनर्जी या आपली चार वर्षांची मेहनत पूर्ण करून देशातील पहिल्या सागरी अभियंता बनल्या.
1999: कारगिल संघर्षाच्या वेळी भारताने बंदी घातलेल्या पाकिस्तानी कैद्यांना सोडून दिलं.