26th August In History :  आज इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भारतरत्न, समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. लेखक, पत्रकार सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. स्वातंत्र्यसैनिक, अभिनेते  ए. के. हंगल यांचा आज स्मृतीदिन आहे. 



1910 : भारतरत्न, समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म


भारत रत्न आणि नोबेल शांतता पुरस्कार सन्मानित करण्यात आलेल्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा आज जन्मदिन. मदर तेरेसा यांचे मूळ नाव  Anjezë Gonxhe Bojaxhiu असे आहे. त्या भारतीय रोमन कॅथलिक नन होत्या. 1948 मध्ये त्यांनी स्वेच्छेने भारतीय नागरिकत्व स्वीकारले. ऑट्टोमन साम्राज्याचा एक भाग असलेल्या स्कोप्जे येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या 18 व्या वर्षी त्या आयर्लंडला गेल्या. त्यानंतर पुढे भारतात आल्या आणि इथले नागरिकत्व स्वीकारून भारतीय झाल्या. 


मदर तेरेसा धाडसीही होत्या. बैरूतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. 1982 मध्ये पॅलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने 37 लहान मुलांची सुटका घडवून आणली. त्या स्वतः युद्धभूमीवर हिंडल्या.


त्या भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आल्या, त्यांनी अनेकांना तसा बाप्तिस्मा दिला, अशा असंख्य वार्ता त्या काळात उठत राहिल्या, पण तो सगळा तथ्यहीन होत्या. त्या एकदा अशाच टीकेला त्रासून म्हणाल्या, की होय, मी त्यांचे ‘धर्मातर’ घडवते. हिंदूंना अधिक चांगले हिंदू बना असे मी म्हणते, मुस्लिमांना मी अधिक चांगले मुस्लिम व्हा, असे सांगते आणि ख्रिश्चनांकडे अधिक चांगले ख्रिश्चन बना असा आग्रह धरते असे त्यांनी म्हटले. 


1922: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक ग. प्र. प्रधान यांचा जन्म


गणेश प्रभाकर प्रधान हे  समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. महाराष्ट्राला ते ग. प्र. प्रधान या नावाने परिचित होते. ग. प्र. प्रधान हे 18 वर्ष आमदार होते. त्यातील दोन वर्ष ते विरोधी पक्षनेते होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.


पुण्यात विद्यार्थिदशेतच ते समाजवादी नेते ना. ग. गोरे आणि एस.एम. जोशी यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी 1942 च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी 13 महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.


1944:  लेखक सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचा जन्म


सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक अनिल अवचट यांचा आज जन्मदिन. त्यांनी आपल्या पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत त्यांनी पुण्यात "मुक्तांगण" हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू केले. तसेच पश्चिम भारताच्या पातळीवर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र सुरू केले आणि महिलांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण केला. मुक्तांगणाची गोष्ठ आणि गर्द ऐसी ही दोन पुस्तके त्यांनी मुक्तांगण आणि तेथील रुग्णांचे अनुभव यावर लिहिली आहेत. या सामाजिक कार्यासाठी त्यांना 2013 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. 


1969 मध्ये अनिल अवचट यांनी आपले पहिले पुस्तक पूर्णिया हे प्रसिद्ध केले. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले होते. त्यांची 22 पेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली. अवचट यांच्या सृष्टीत..गोष्टीत या कथासंग्रहाला मराठी बाल साहित्य पुरस्कार श्रेणीत साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. अवचट यांनी मजूर, अनुसूचित जाती,  भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी लिखाण केले. 


1948 : नाटककार आणि पत्रकार कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन


कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे ख्यातनाम मराठी नाटककार, पत्रकार होते. कृष्णाजी प्रभाकर ऊर्फ काकासाहेब खाडिलकर हे मराठी नाटककार होते. पारतंत्र्याच्या काळात पत्रकार म्हणून ते आपले विचार 'केसरी'च्या द्वारे लोकांसमोर मांडू लागले होते.  पण त्याच काळात खाडिलकरांनी 'स्वयंवर' 'मानापमान' सारखी ललित नाटके लिहिली. ते ‘नाट्यचार्य खाडिलकर’ म्हणून प्रसिद्ध आहेत. खाडिलकर हे ध्येयवादी होते. उदात्त गुणांचे त्यांना आकर्षण होते. काही जीवनमूल्यांवर त्यांची निष्ठा होती. 


कृष्णाजी खाडिलकर यांनी केसरी वृत्तपत्र सोडल्यानंतर लोकमान्य या वृत्तपत्रात काम सुरू केले. मात्र,  'लोकमान्य' दैनिकाशी असलेला आपला संबंध एक सपाट्यासरशी तोडला आणि ते बाहेर पडले. लोकमान्यांच्या पश्चात नव्या परिस्थितीत महात्मा गांधीजीचे राजकारण हे आपल्या गुरूच्या विचारांची पुढली पायरी आहे. हे त्यांनी मान्य केले. त्यांनी मुंबईत जानेवारी 1924 मध्ये 'नवाकाळ' हे वृत्तपत्र सुरू केले. खाडिलकर यांनी महात्मा गांधी यांचे नेतृत्व मान्य केले असले तरी ते गांधीवादी झाले नाही. गांधीवादाचे कर्मकांड त्यांनी स्वीकारले नाही.


2012 : स्वातंत्र्यसैनिक, अभिनेते  ए. के. हंगल यांचे निधन


हिंदी चित्रपटांमधील एक प्रसिद्ध चरित्र अभिनेते अवतार किशन हंगल अर्थात ए. के. हंगल यांचा आज स्मृतीदिन. हंगल यांनी 200 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. 'नमक हराम', 'शोले', 'शौकीन', 'आइना' असे अनेक त्यांचे चित्रपट प्रसिद्ध आहेत. इतना सन्नाटा क्यों है भाई?, या संवादातून शोलेमधील रहीम चाचाची त्यांची भूमिका अजरामर झाली. 


ए. के. हंगल यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला होता. पेशावरमध्ये जन्म झालेल्या ए. के. हंगल यांनी 1929 ते 1947 दरम्यान देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. यादरम्यान त्यांना तीन वर्षे कराची तुरुंगात काढावी लागली. यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले. हंगल यांना सुरुवातीपासून अभिनयाची आवड होती. 


हौशी रंगभूमीवर काम करीत असलेले हंगल यांना चित्रपटांमधून काम करण्याची फारशी इच्छा नव्हती. परंतु, परिस्थितीमुळे त्यांना चित्रपट जगतात यावे लागले. रंगभूमीशी जवळीक असणा-या हंगल यांनी अनेक नाटकं लिहून त्यामध्ये भूमिकाही केल्या आहेत. इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) या संस्थेशी ते फार पूर्वीपासून जोडलेले होते. अभिनयासोबत त्यांनी सक्रिय राजकारणातही सहभाग घेतला. ए.के. हंगल हे कम्युनिस्ट पक्षाचे अखेरपर्यंत सभासद होते. 


2006 मध्ये ए.के. हंगल यांना चित्रपट, रंगभूमी क्षेत्रातील योगदानासाठी  पद्मभूषण या नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. द लाइफ अ‍ॅण्ड टाइम ऑफ ए. के. हंगल हे त्यांचे आत्मचरित्र इंग्रजीत प्रसिद्ध आहे. मराठीमध्ये त्यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले आहे. 


इतर महत्त्वाच्या घटना : 


1303 : अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले.
1768: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले.
1927: प्रख्यात वास्तुविशारद बी. व्ही. दोशी यांचा जन्म.
1928 : हिरो साइकिलचे सहसंस्थापक ओम प्रकाश मंजाल यांचा जन्म
1972: जर्मनीतील म्युनिच येथे 20 व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात.