नागपूर: मुंबईवरील 26/11 हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावलेला दहशतवादी अबू जुंदाल, सध्या मुंबईतील मध्यवर्ती कारागृहात आहे. मात्र त्याच्या कुरापती जेलमध्येही सुरुच आहेत.
26/11 हल्ल्याच्या मास्टर माईंडपैकी एक असलेला अबू जुंदाल सध्या ‘माईंड गेम’ खेळत आहे. जुंदाल भारतीय कायद्याचा वापर करत, आरटीआय अर्थात माहिती अधिकाराच्या सहाय्याने राजकीय माहिती गोळा करण्याच्या प्रयत्नात आहे.
पण थेट दहशतवादी कारवायात सहभागाचा आरोप असलेल्या अबू जुंदालला माहिती दिल्याने देशहिताला बाधा येऊ शकते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव त्याच्या माहिती अधिकाराचं अपिल फेटाळण्यात आलं.
अबू जुंदालने नेमकी कोणती माहिती मागवली?
अबू जुंदालने मुंबईतील कारागृहातून आरटीआय अंतर्गत बरीच माहिती मागितली आहे. यामध्ये बीडच्या 1980 पासून म्हणजेच त्याच्या जन्मापासूनची निवडणूक माहितीचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे छोट्या छोट्या मोहल्ल्यातील अगदी नगर परिषद/ पालिका निवडणुकीत हरलेले, जिंकलेले अशा सर्व उमेदवारांची माहिती अबू जिंदालने मागितली आहे.
पण गल्लोगल्लीची जुनी माहिती उपलब्ध नसल्याने त्याचा अर्ज फेटाळला आहे. मात्र जुंदालने त्याला आव्हान दिलं. पण राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकर यांनी त्याचं अपिल फेटाळलं.
न्यायालयात दोषी सिद्ध झालेला, तसंच जन्मठेपेची शिक्षा झालेल्या दहशतवाद्याला माहिती देणं हे देशहिताच्यादृष्टीने योग्य नाही. त्यामुळे जुंदालला माहिती देत नसल्याचं माहिती आयुक्तांनी म्हटलं.
महत्त्वाचं म्हणजे अबु जुंदालने माहिती मागवण्यासाठी 10 रुपयाची स्टॅम्प फी न भरता मी तुरुंगात असल्यामुळे मला दारिद्र्य रेषेखालील समजावे असं म्हटलं आहे.
अबू जुंदालवरील आरोप
26/11 हल्ल्यावेळी अबू जुंदाल दहशतवाद्यांना पाकिस्तानातील कंट्रोल रुममध्ये बसून सूचना देत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.
विशेष मकोका कोर्टाने त्याला 2 ऑगस्ट 2016 रोजी औरंगाबाद स्फोटकांप्रकरणी जन्मठेप सुनावली. जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, कालूपुर स्टेशन स्फोट या सर्व खटल्यांमध्येही तो आरोपी आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात 166 निरपराध लोकांचा बळी गेला होता तर 300 लोकं जखमी झाले होते. याशिवाय कोट्यवधींच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं.
कोण आहे अबू जुंदाल?
अबू जुंदाल हा मूळचा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील हाथी खान मोहल्ल्यात जन्माला
त्याने बीडमधेच आयटीआयचे शिक्षण घेतले. पण नंतर दहशवादी संघटनांच्या संपर्कात आला आणि अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाला.
अबू जुंदालकडे पाकिस्तानी पासपोर्ट सापडला होता. त्याने रियासत अली हे नवे नाव धारण केलं होतं.
लष्कर ए तोयबातील कारवायांमुळे तो अमेरिका आणि भारत दोघांच्याही निशाण्यावर होता.
तपास यंत्रणांनी त्याला सौदी अरेबियात अटक करुन भारतात आणलं होतं.
संबंधित बातम्या
26/11 हल्ल्यातील आरोपी अबु जुंदालविरुद्धच्या खटल्याला स्थगिती
अबू जुंदालसह 7 जणांना मरेपर्यंत जन्मठेप
कोर्टासमोर कबुलीजबाब नोंदवण्यास जिंदाल तयार
२६/११ हल्ल्यातील सहभागाची अबू हमजाची कबुली