26/11 Mumbai Attack : 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसाठी तसेच संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला होता. समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात त्या दिवसाच्या जखमा ओल्या आहेत. या घटनेला आज 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करत आहे.  


26/11 हल्ल्यातील वीर शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन
'मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या शहीद वीरांना आणि या हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या सर्वांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट करून वीर शहीदांसह तसेच हा हल्ला परतवून लावण्यासाठी निकराचा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मुंबईवरील हल्ला हा दहशतवाद्यांची भ्याड मनोवृत्ती स्पष्ट करणारा होता', अशी निर्भत्सनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 


'मुंबईवरील हल्ला हा भारताच्या आर्थिक राजधानीवरील हल्ला होता. देशाच्या विकासाला खीळ घालण्याचा हा प्रयत्न मुंबईकरांनी उधळून लावला. त्यामध्ये मुंबई पोलीसांनी शौर्याची परिसीमा गाठली. केवळ मराठीच नव्हे तर, संबंध भारतीय मनोधैर्य एकवटले.  वीर जवान तुकाराम ओंबळे यांनी निशस्त्र असतानाही क्रूरकर्मा दहशतवाद्याला जेरबंद करण्यासाठी बलिदान पत्करले. पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी गोळ्या झेलून, अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या शौर्य, धैर्य आणि समर्पणासमोर नतमस्तक होण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भ्याड हल्ल्यांना भीक न घालण्याची, आव्हानांवर मात करण्याचे मनोधैर्य आणखी उंचावेल ते  पुढच्या पिढ्यांमध्ये विकसित व्हावे यासाठी आपण सर्व प्रयत्न करूया. हेच या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना आणि निष्पाप बळींना अभिवादन ठरेल',असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. 



मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलिस व अन्य सुरक्षा दलातील वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयात जाऊन मानवंदना दिली तसेच स्मृतीस्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहीद पोलिसांच्या कुटुंबियांप्रती उपमुख्यमंत्र्यांनी सहसंवेदना व्यक्त केली. दहशतवादी हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून मुंबई हल्ल्यावेळी शहराचे रक्षण व नागरिकांचे जीव वाचण्यासाठी योगदान दिलेल्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. “मुंबईवरील सव्वीस-अकरा (2008) दहशतवादी हल्ल्यावेळी शहराचं रक्षण, नागरिकांचा जीव वाचवताना मुंबई पोलिस, एनएसजी, गृहरक्षक, अग्निशमन, सर्वच सुरक्षा दलांच्या अधिकारी, जवानांनी असामान्य धैर्य, शौर्य, पराक्रमाचं दर्शन घडवलं. सामान्य मुंबईकरांनंही हल्ल्याचा निर्धारानं सामना केला. संयम पाळला. दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावले. आत्मघातकी दहशतवाद्याला जिवंत पकडण्याची ऐतिहासिक कामगिरी घडली. 26/11 च्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या वीरांच्या त्यागाला, शौर्याला, देशभक्तीला तोड नाही. प्रत्येक भारतवासी या शहीदवीरांच्या त्यागाबद्दल कृतज्ञ राहील,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदवीरांचे स्मरण करुन त्यांना कृतज्ञतापूर्वक आदरांजली वाहिली आहे. हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांनाही उपमुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच इतर मंत्र्यांसह मुंबई पोलीस हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून  13 वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात हौतात्म्य प्राप्त झालेल्या पोलीस अधिकारी, जवान तसेच एनएसजी कमांडो यांना श्रद्धांजली वाहिली.






मुंबईवरील दहशतवादी हल्यातील शहीद वीरांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यावेळी पोलिसांनी, सुरक्षा दलांनी बजावलेली कामगिरी हा देशाचा गौरवशाली इतिहास आहे. मुंबईच्या रक्षणासाठी पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी, जवान त्यावेळी स्वयंप्रेरणेने रस्त्यावर उतरला. जीवाची जोखीम पत्करुन कर्तव्यनिष्ठेने दहशतवाद्यांचा मुकाबला केला. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या वीराने शरीरावर गोळ्या झेलून कसाबसारखा आत्मघातकी दहशतवादी जिवंत पकडून दिला. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीला जगाच्या इतिहासात तोड नाही. मुंबई पोलिसांनी देशरक्षणासाठी बजावलेलं कर्तव्य, केलेला त्याग देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. मुंबई पोलिसांचं हौतात्म्य भावी पिढीला देशसेवेची, कर्तव्याची जाणीव करुन देईल. नागरिकांच्या मनातील पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ करील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.



महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या माध्यमातून मागील 5 वर्षांपासून 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यंदा या कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मंत्री अदिती तटकरे हे गेट वे ऑफ इंडिया येथे उपस्थित होते.