लातूर : एका घटनेतून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या रुद्रवाडी या छोट्याशा गावात मोठा वाद निर्माण झाला. यामुळे गावातील 24 कुटुंबांना गाव सोडावं लागलं. या घटनेला वैयक्तिक, जातीय , राजकीय असे सर्वच पैलू आहेत. मात्र, यातून निर्माण झालेला सामाजिक प्रश्न आता गंभीर झाला आहे.
घटनेच्या निषेधार्थ लातूर बंद ठेवण्याचा आज प्रयत्न करण्यात आला. प्रकरण वाढले असे लक्षात आल्यावर प्रशासनाने या सर्व 24 कुटुंबाची व्यवस्था सरकारी गायरानावरील एका पडक्या वसतीगृहात केली. या कुटुंबांना गावाकडे जाण्याची इच्छा राहिली नाही. विशेष म्हणजे विस्थापित झालेल्यांमध्ये गावच्या सरपंच बाई सुद्धा आहेत. गावकऱ्यांमध्ये हा केवळ दोन कुटुंबातला वाद होता, ज्याला जातीय रंग दिला जातोय.
काय आहे वाद?
विस्थापित कुटुंबीयांचे उदास चेहेरे अनेक प्रश्न डोळ्यात घेऊन शांत बसलेले आहेत. ज्या गावात लहानाचे मोठे झालो, ते गाव अचानक सोडावं लागलं. याचं दुःख आणि विषाद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. 24 कुटुंबातील शंभर लोक आज रुद्रवाडी सोडून उदगीर येथील एका पडक्या वसतीगृहात आश्रयाला आले आहेत.
9 मे रोजी रुद्रवाडीतल्या मातंग समाजात लग्न होतं. वाजतगाजत मारोतीच्या पारावर नवरदेव आला. गावातील काही तरुणांनी तुम्ही मंदिरावर का जाता असा सवाल करत मारहाण केल्याचा आरोप आहे.
वाद वाढला आणि गावातील लोकांनी जमाव जमवून मातंग वस्तीवर हल्ला केला. प्रकरण पोलिसात गेलं. 23 जणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय. यातील 13 जणांना अटक झाली आहे. या घटनेचा आधार घेत अनेक संघटना आणि राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत.
गावातील सरपंचपद हे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मातंग समाजातील शालूबाई शिंदे या मागील तीन वर्षांपासून बिनविरोध सरपंच आहेत. त्याचाही या विस्थापितांमध्ये समावेश आहे. त्याच्या पतीला तीन ते चार वेळा गावात मारहाण झाल्याचं त्या सांगतात.
मी नावालाच सरपंच आहे. कारभार तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि उपसरपंच चालवतात. ज्याच्यासाठी मी सरपंच झाले त्यांचे काहीच काम करू शकत नाही. गावात राहून काय करावं असा विचार आला यामुळे गाव सोडलं असं सरपंच सांगतात.
या गावात जवळपास शंभर घरं आहेत. त्यात 25 घरे ही मातंग समाजाची आहेत. एकाही घरात जमीन नाही. गावातील इतर समाजाच्या शेतात राबणे आणि घर चालवणे असेच जीवन आहे. काही तरुण पोटासाठी पुण्यात कामाला आहेत. बाकी शिक्षणाच्या नावाने अंधारच आहे.
कुणाच्याही घरात एकही व्यक्ती नोकरी करत नाही. सर्वजण मजुरीवरच पोट भरतात. उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन करुन पुनर्वसन करण्याची मागणी केली. अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर सरकारकडून काही आर्थिक मदत आणि तीन महिन्याचे धान्य मिळाले आहे. मात्र जागेचे काय असा प्रश्न निर्माण झाला.
गावात वातावरण तणावाचं आहे. गावात पोलिसांची तात्पुरती छावनी उभी करण्यात आली आहे. गावातील 24 कुटुंबांनी गावच सोडल्याने गाव सुनंसुनं झालंय. 23 लोकांवर गुन्हा दाखल आहे. गावात लोकच दिसत नाहीत. गावातील वृद्ध बोलतायत, ''गावातील काही मुलींना त्रास दिला जात होता याचा जाब विचारला तर उलट मारहाण झाली.. मंदिराचा विषयच नाही.''
गावातील 24 कुटुंबानी चार तारखेला उदगीर उपजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं. पुनर्वसनाची मागणी केली. सात तारखेला विस्थापित कुटुंबांची उदगीर शहरातल्या मोडकळीस आलेल्या इमारतीत राहण्याची सोय करण्यात आली. या इमारतीत विजेचीही व्यवस्था नाही. पुरोगामीत्वाचं माहेरघर असा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात या कुटुंबांना आपलं गाव आणि घर सोडून असं बाहेर किती दिवस रहावं लागतं, हा प्रश्नच आहे.
घटनाक्रम
गावात आठ मे रोजी मंदिर प्रवेशावरुन भाडणं
नऊ मे रोजी लग्न
10 मे रोजी पुन्हा दोन तरुणाच्या गटात भाडणं
11 तारखेला दुपारी 23 जणांविरोधात गुन्हा दाखल
20 तारखेला 12 लोकांना अटक, बाकी फरार
बहिष्कार आणि मारहाणीची भीती यामुळे गावात दहशत होती