21st August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म आजच्या दिवशी झाला, त्यांना 'जलनायक' म्हणून संबोधलं जातं. ख्यातनाम सनईवादक बिस्मिल्ला खान यांचं निधन आजच्या दिवशी झालं. आजच्या दिवशी इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.


1934: महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांची 21 ऑगस्ट रोजी जयंती. महाराष्ट्रातील यवतमाळमध्ये त्यांचा जन्म झाला. सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री होते आणि त्यांना 'जलनायक' म्हणून ओळखलं जातं. जलसंधारणाचं खरं कार्य सुधाकरराव नाईक यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ कायमचा नाहीसा करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र जलसंवर्धन खात्याची निर्मिती करून राज्यात भरीव काम केलं आणि त्यामुळेच  महाराष्ट्र सरकारने 10 मे हा त्यांचा स्मृतिदिन 'जलसंधारण दिन' म्हणून घोषित केला आहे.


देशात पहिल्यांदाच जलसंधारण खात्याची स्वतंत्र निर्मिती करून त्यांनी जलक्रांतीची बीजं रुजवली. पाणी अडवा, पाणी जिरवा हा मूलमंत्र त्यांनी लोकांना दिला. महिला आणि बालकल्याण विभागाची निर्मिती देखील सुधाकरराव नाईक सरकारच्या कारकिर्दीत झाली. मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढीसाठी सुधाकरराव नाईक यांनी मुलींचं शैक्षणिक शुल्क माफीचं तसेच उपस्थिती भत्ता सारख्या कल्याणकारी योजना सुरू केल्या.


सुधारकरराव नाईक यांनी राजकारणाची सुरुवात ही स्थानिक स्वराज्य संस्थेपासून केली होती. यामुळे प्रशासन कसं काम करतं याचा दांडगा अनुभव होता. मुख्यमंत्री पदापासून ते राज्यपाल पदापर्यंत त्यांनी उत्कृष्ट काम केलं.


2006: भारतरत्न ख्यातनाम सनईवादक बिस्मिल्ला खान यांचं निधन


लग्नसमारंभ किंवा कोणतंही शुभकार्य, अशा मंगलमय वातावरणाला सनईचे सूर अधिकच प्रसन्न बनवतात. भारतामधील सनई या वाद्याला जगभर खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली ती म्हणजे उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी. उस्ताद बिस्मिल्ला खान यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी बिहारमधील डुमरोन येथे झाला, त्यांचे वडील भोजपूरच्या राजाच्या दरबारी संगीतकार होते. घरात संपूर्णपणे कलेचं वातावरण असल्यामुळे बिस्मिल्लाह खान अगदी लहान वयातच सनई वाजवायला शिकले. बिस्मिल्लाह खान यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य होतं.


1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे. बिस्मिल्लाह खान त्यावेळी मुंबईत होते, त्यांना विमानाने दिल्लीत आणलं गेलं आणि सुजान सिंह पार्क येथे राजकीय पाहुणे म्हणून त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. 1959 साली यांनी 'गूँज उठी शहनाई' या सिनेमात बिस्मिल्ला खान यांनी संगीत दिग्दर्शनही केलं होतं.'दिल का खिलौना हाए टूट गया' या गाण्याला बिस्मिल्ला खान यांनी संगीत दिलं होतं. बिस्मिल्ला खान यांनी काही हिंदी चित्रपटांमध्ये सनई वादकाची भूमिकाही साकारली होती.


एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि रविशंकर यांच्यानंतर, उस्ताद बिस्मिल्ला खान हे सर्वोच्च नागरी सन्मान प्राप्त करणारे तिसरे शास्त्रीय संगीतकार होते. त्यांना पद्मश्री (1961), पद्मभूषण (1968), पद्मविभूषण (1980) आणि भारतरत्न (2001) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत साधनेला वाहिलं. अखेर 21 ऑगस्ट 2006 रोजी वयाच्या 90व्या वर्षी त्यांचं निधन झालं.


1917: भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे शिल्पकार विनू मांकड यांचं निधन


मूलवंतराय हिम्मतलाल मांकड म्हणजेच विनू माकंड यांचा जन्म 12 एप्रिल 1917 साली जामनगरमध्ये झाला होता. त्यांनी 233 प्रथम श्रेणीचे सामने खेळले. तर, 44 कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. कसोटी सामन्यात 31.47 च्या सरासरीने त्यांनी 2,109 धावा केल्या. त्यात पाच शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. 231 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे. त्यांनी गोलंदाजीत कमाल दाखवत 162 बळी घेतले. 52 धावांत 8 गडी ही त्यांची सर्वोत्कृष्ट गोलंदाजी ठरली. 


भारताला 1932 साली कसोटी क्रिकेटसाठीची मान्यता मिळूनही संघाला पहिल्या कसोटी विजयासाठी दोन दशकं वाट पाहावी लागली होती. विजय हजारे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 1952 साली इंग्लंडवर एक डाव आणि आठ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. विनू मांकड यांनी या कसोटीत इंग्लंडचे 12 गडी बाद केले होते.


इतर महत्त्वाच्या घटना:


1871: भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म. (मृत्यू: 17 नोव्हेंबर 1935)


1888: विल्यम बरोज यांनी बेरजा करणाऱ्या यंत्राचं पेटंट घेतलं.


1911: पॅरिसच्या लुव्र या संग्रहालयातून लिओनार्डो-द-व्हिन्सी याचं मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र चोरीला गेलं.


1915: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि चित्रपट निर्माता इस्मत चुगताई यांचा जन्मदिन.


1976: प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पांडुरंग नाईक यांचं निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1899)


1981: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, पत्रकार- पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते काका कालेलकर यांचं निधन. (जन्म: 1 डिसेंबर 1885)


2001: मराठी रंगभूमीचा वारकरी म्हणून गौरविले गेलेले शं. ना. तथा दादासाहेब अंधृटकर यांचं निधन.


2000: स्वातंत्र्यलढ्यातील आणि गोवा मुक्तीसंग्रामातील प्रमुख सेनानी आणि समाजवादी विचारवंत विनायकराव कुलकर्णी यांचं निधन.


2012: आफ्रिकन देश डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये इबोला विषाणूच्या संसर्गामुळे 20 लोकांचा मृत्यू झाला.


2022: भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे किमान 50 लोकांचं निधन.