21st August Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आजपासून कांद्याची अनुदानित 25 रुपयांनी विक्री होणार आहे. मुंबईत आजपासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद असणार आहे.  केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शेतकरी आंदोलन करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद असणार आहेत.


नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद


केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे, याच्या निषेधार्थ आजपासून नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या बेमुदत काळासाठी बंद राहणार आहेत. जयदत्त होळकर, संचालक मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात शुल्क वाढीनंतर नाराज व्यापारी आणि उत्पादक अनेक ठिकाणी आंदोलन करणार आहेत.


आजपासून कांद्याची अनुदानित 25 रुपयांनी विक्री


आजपासून सहकारी संस्था नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (NCCF माध्यमातून प्रति किलो 25 रूपये दरात कांद्याची विक्री सुरू होणार आहे. शनिवारी केंद्र सरकारने देशातून होणाऱ्या कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. निर्यातीवरील ही बंदी 31 डिसेंबर 2023 पर्यंत लागू राहील. कांद्याच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी म्हणून सरकारने त्याच्या बफर स्टॉकची मर्यादा वाढवली आहे. यापूर्वी कांद्याची बफर मर्यादा 3 लाख मेट्रिक टन होती ती वाढवून आता 5 लाख टन केली आहे. सरकारने एनसीसीएफ आणि नाफेड या दोन्ही सहकारी संस्थांना प्रत्येकी 1 लाख टन अतिरिक्त खरेदी करण्यास सांगितलं आहे.


आजपासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद


पर्यावरण रक्षणासाठी पालिका आजपासून प्लॅस्टिक पिशवीबंदीची धडक कारवाई सुरू करणार आहे. कारवाईदरम्यान 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्यास पाच हजारांचा दंड आकारला जाणार, तर ग्राहकांकडे अशी पिशवी आढळल्यास प्रबोधन करून कारवाईचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती आहे. कारवाई पथकात एका पोलीस अधिकाऱ्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एक अधिकारी आणि पालिकेच्या तीन अधिकाऱ्यांचा समावेश भरारी पथकाकडून दुकानदार, फेरीवाले आणि मॉलमध्ये कारवाई केली जाणार आहे.


सांगलीतील शिराळात नागपंचमी उत्सव


शिराळातील नागपंचमी प्रसिद्ध आहे आणि तिला ऐतिहासिक परंपरा देखील आहे. शिराळा येथे आज नागपंचमी निमित्त जिवंत नागपूजा करण्याची प्रथा होती, मात्र काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर गेल्या काही वर्षेपासून जिवंत नागाची पूजा करणाऱ्या प्रथेवर बंदी आली आहे. आज शिराळामध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 500 च्या आसपास पोलस आणि 150 हून अधिक वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त शिराळा परिसरात तैनात ठेवण्यात आली आहे.


आज पहिला श्रावणी सोमवार


नीज  श्रावण मासातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त नाशिकमधील त्रंबकेश्वरला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व शिव मंदिरात आज भाविकांची प्रचंड गर्दी असणार आहे.


दिल्ली - बिहार जात सर्वेक्षण प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर करण्यावर अंतरिम स्थगिती द्यायची की नाही यावर न्यायालय आज निर्णय घेऊ शकते. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, प्रथमदर्शनी खटला काढायचा असेल, तर सुनावणी पूर्ण होईपर्यंत केवळ आकडेवारीचे प्रकाशन थांबवलं जाईल, असे न्यायालयाने म्हटलं आहे.


मुंबई – खासदार राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. माझगाव कोर्टात होणाऱ्या सुनावणीत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत, लावणार का हजेरी?, 'सामना' या राजकीय मुखपत्रात शिवसेना (शिंदे गट) खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात बदनामीकारक मजकूर प्रकाशित केल्याचं हे प्रकरण. मुंबई शिवडी महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयानं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना हजेरीचं समन्स जारी.