स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली होती. मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात आली होती.  संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचे आजच्याच दिवशी निधन झाले होते. आजच्या दिवशी इतिहासात कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या हे सविस्तर जाणून घेऊयात. 


1924: अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका


अॅडॉल्फ हिटलर हा ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला जर्मन राजकारणी होता.  जो 1933 ते 1945 मध्ये त्याच्या आत्महत्येपर्यंत जर्मनीचा हुकूमशहा होता. तो नाझी पक्षाचा नेता म्हणून सत्तेवर आला होता. त्याच्या हुकूमशाहीच्या काळात त्यांनी 1 सप्टेंबर 1939 रोजी पोलंडवर आक्रमण करून युरोपमध्ये दुसरे महायुद्ध सुरू केले . संपूर्ण युद्धात लष्करी कारवायांमध्ये त्यांचा जवळून सहभाग होता. आजच्याच दिवशी म्हणजे 20 डिसेंबर 1924 रोजी अडोल्फ हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका झाली होती. 


1933: विष्णूशास्त्री वामन बापट यांची पुण्यतिथी 


विष्णूशास्त्री वामन बापट यांची आज पुण्यतिथी आहे. भाषांतरकार विष्णू वामन बापट यांनी विविध भाषांतील ग्रंथांची भाषांतरे केली. त्यांच्या नावावर 70 भाषांतरित ग्रंथ आहेत.


1956:  संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी


स्वच्छतेची शिकवण देऊन किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज (Gadge Maharaj) मानवतेचे खरे परोपकारी, सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज. गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे. गाडगेबाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव येथे झाला होता. डेबूजी झिंगारजी जानोरकर असे त्यांचे नाव होते. गाडगेबाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेलं. गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोषाख त्यांचा असायचा. गाडगे महाराज हे सामाजिक रुढी आणि परंपरेवर जोरदार प्रहार करत होते. किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले. गाडगेमहाराज यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन होता. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते. याचाच शोध ते घेत होते. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. 


1970: अभिनेता सोहेल खानचा जन्मदिवस 


अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक सोहेल खान याचा आज वाढदिवस आहे. सोहेल खानचा जन्म 20 डिसेंबर 1970 रोजी मुंबईत झाला. सोहेल हा बॉलिवूडचे प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांचा मुलगा असून तो सलमान खानचा भाऊ आहे. सोहेलने 1997 मध्ये 'औजार' चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटात संजय कपूर, सलमान खान आणि शिल्पा शेट्टी मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर सोहेलने 1998 मध्ये आलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' या यशस्वी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटाचा तो निर्माताही होता. या चित्रपटात सलमान खान, अरबाज खान, काजोल आणि धर्मेंद्र मुख्य भूमिकेत होते. यानंतर सोहेलने 2002 मध्ये आलेल्या 'मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची सुरुवात केली. 2005 मध्ये आलेला 'मैने प्यार क्यूं किया' हा सोहेल खानचा पहिला हिट चित्रपट होता.


1988: मतदानाचे वय 21 वरून 18 पर्यंत कमी करण्याचे विधेयक मंजूर


1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधान करण्यात आले. राजीव गांधी यांचा कार्यकाळ अनेक महत्त्वाच्या निर्णयांसाठी लक्षात ठेवला जातो. त्यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे 18 वर्षांच्या तरुणांना मतदानाचा अधिकार देण्याचा. 20 डिसेंबर 1988 रोजी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यासाठी संसदेत कायदा मंजूर करण्यात आला.


इतर महत्त्वाच्या घडामोडी


1731: बुंदेलखंडचे महाराजा छत्रसाल बुंदेला यांचे निधन.
1942 : दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला
1945 : मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
1999 : पोर्तुगालने मकाऊ हे बेट चीनला परत दिले.