19th August Headlines : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचा पहिला टप्पा आज संपणार आहे. पुढील आठवड्यात दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. मुंबईत आजपासून महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरुवात होणार आहे. तर, दुसरीकडे आजपासून काश्मीर महिला क्रिकेट लीग श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघ आढावा बैठकीचा पहिला टप्पा आज संपणार
मुंबई - आज ठाकरे गटाच्या लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकांचा पहिल्या टप्प्यातील आज शेवटचा दिवस आहे. आज कोल्हापूर, सांगली, सातारा आणि हातकणंगले या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येला भेट देणार
अयोध्या - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज अयोध्येला भेट देणार आहेत. श्री राम मंदिरात पूजा केल्यानंतर मंदिराच्या बांधकाम आणि विकासकामांचे मुख्यमंत्री आदित्यनाथ निरीक्षण करतील.
आजपासून काश्मीर महिला क्रिकेट लीग
श्रीनगर - काश्मीरमध्ये महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय लष्कर श्रीनगरमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे. आजपासून काश्मीर महिला क्रिकेट लीग श्रीनगरच्या शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. यावेळी महिला क्रिकेटपटू मिताली राज आणि एलजी मनोज सिन्हा देखील उपस्थित राहणार आहेत.
आज कोर्टातील महत्त्वाच्या सुनावणी :
मुंबई- दापोली साई रिसोर्ट प्रकरणी अटकेत असलेल्या सदानंद कदम आणि जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर आज कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.
मुंबई - हसन मुश्रीफांचे स्वीय सचिव महेश गुरव यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता आहे.
आजपासून महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरुवात
मुंबई - आजपासून महिला बचत गटांसाठी आठवडी बाजारांची सुरुवात होणार आहे. मुंबईत महिला बचत गटांसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आठवडी बाजाराच्या माध्यमातून वस्तू विक्रीसाठी व्यासपीठ मिळणार आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यवतमाळ, चंद्रपूर दौरा
यवतमाळ - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जिल्हा दौऱ्यावर असणार आहेत. मारेगाव येथील शेतकरी संस्था मारेगाव द्वारा संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
चंद्रपूर - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज चंद्रपूर शहराच्या दौऱ्यावर असून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या अभ्यासिकेचं त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे.