18th December Headlines: राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. 


अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापान, पत्रकार परिषद


राज्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज नागपूरमध्ये चहापानचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर दुपारी 1 वाजता विरोधी पक्ष नेत्यांची  पत्रकार परिषद होणार आहे. प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चहापानासाठी आमंत्रित केले आहे. यानंतर संध्यकाळी 6 वाजता मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे 


आज फीफा वर्ल्डकप (Fifa World Cup Final)


कतारमध्ये आज अर्जेंटीना आणि फ्रांसमध्ये मेगा फायनल होणार आहे, भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सामना सुरु होईल. फ्रान्स सध्याचा विश्वविजेता आहे, तर अर्जेंटिनाने अखेरचा विश्वचषक 1968 मध्ये जिंकला होता.


बेळगावात संभाजीराजेंच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण


संभाजीराजे छत्रपतींच्या हस्ते बेळगावमधील होणगा गावात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. बेळगाव सीमाप्रश्नाचा आणि शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्याचा वाद सध्या सुरु असताना संभाजीराजेंचा हा दौरा महत्वाचा आहे. छत्रपती संभाजीराजे नियोजित बेळगाव दौरा व स्वराज्य संघटनेचे झी स्टुडीओ वरील हल्लाबोल आंदोलन याबाबत पत्रकार परिषद घेणार आहेत, सकाळी 8 वाजता. 


पुण्यात कर्नल पुरोहितांच्या पुस्तकाचं प्रकाशन, वादामुळे प्रकाशन होणार का?


लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावर स्मिता मिश्रा यांनी लिहीलेल्या लेफ्टनंट कर्नल पुरोहित ‘द मॅन बिट्रेयड’ या पुस्तकाच प्रकाशन आज पुण्यातील एस पी कॉलेजमधे होणार आहे. माजी आय पी एस अधिकारी जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंह आणि संजय बर्वे हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. मात्र या पुस्तकाचे प्रकाशन करण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी मालेगाव बॉंब स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांकडून वकिलामार्फत एन आय ए न्यायालयाला करण्यात आलीय.  त्याचबरोबर मालेगाव बॉंब स्फोटातील कर्नल पुरोहित यांच्याबरोबर सह आरोपी असलेल्या रमेश उपाध्याय यांनीही ट्वीट करुन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येऊ नये अशी मागणी केलीय. त्याचबरोबर पुण्यातील भीम आर्मी आणि मुल नीवासी मुस्लिम मंच या संघटनांकडून देखील या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येऊ, नये अशी मागणी करण्यात आलीय.