18th August Headlines : आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिली. त्या पार्श्वभूमीवर आजच्या मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे विजयदुर्गवर 'जागतिक हेलियम दिवस' साजरा होणार आहे. विजयदुर्गवर हेलियमचा शोध लागला होता. तर, मुंबई विद्यापीठाने गुरुवारी रात्री अचानक सिनेट निवडणूक स्थगित केल्याने त्याचे पडसाद आज उमटण्याची शक्यता आङे. 



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते  नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन


बुलढाणा -  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील नांदुरा ते शेलाद या महामार्गाचे चौपदरीकरणाच्या कामाचं उद्घाटन आज होणार आहे. 
 


राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक


मुंबई – राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता मंत्रालयात होणार आहे. या बैठकीत राज्यभरातील पीक-पाण्याचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचसोबत पाणीसाठा याचाही आढावा घेऊन काही उपाययोजना करायच्या का यावरती ही चर्चा होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. 



विजयदुर्गवर आज साजरा होणार 'जागतिक हेलियम दिवस' 


सिंधुदुर्ग – छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा विजयदुर्ग किल्ला हेलियम वायूच्या शोधाचा देखील साक्षीदार आहे. हेलियम वायूच्या शोधाची जन्मभूमी म्हणजे विजयदुर्ग किल्ला. 1868 साली विजयदुर्ग किल्ल्यावरुनच हेलियम वायुचा शोध लावण्यात आला. विजयदुर्ग किल्लावर असणारी 'साहेबांचा ओट' या जागी विजयदुर्गचे नागरिक आज दिवस 'जागतिक हेलियम दिवस' म्हणून करणार आहेत.
 


नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी आरोपींच्या याचिकेवर सुनावणी


कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणी रसेश शहा आणि राज्यकुमार बंसल या आरोपींनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. खालापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रद्द करत अटकेपासून संरक्षण मागत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. 


खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनावर आज विशेषाधिकार समिती बैठक
 


दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावर आज विशेषाधिकार समितीची बैठक होणार आहे. विशेषाधिकार समितीची ही बैठक दुपारी 12.30 वाजता संसद भवन संकुलात होणार आहे. विशेषाधिकार समिती सर्व वस्तुस्थिती तपासून लोकसभेच्या अध्यक्षांना आपली सूचना देईल. विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांना सभागृहात असभ्य वर्तन केल्याच्या आरोपावरून सभागृहाच्या कामकाजातून निलंबित करण्यात आले आहे.