Buldhana : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांच्या हस्ते आज बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. मात्र, हा लोकार्पण सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. रस्ता पूर्ण न करताच नितीन गडकरी हे रस्त्याचं लोकार्पण करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला आहे. 45 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण झालं आहे. यामध्ये अनेक ठिकाणी पुलांचे काम अर्धवट राहिल्याचे महाविकास आघाडीनं म्हटलंय.


मुबंई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 च्या नांदुरा ते जळगाव जिल्ह्यातील चिखली रंमथम पर्यंत 800 कोटी रुपये खर्च करून 45 किलोमीटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातून हा मार्ग जात आहे. या महामार्गाचे लोकार्पण सोहळा रस्ते  वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज मलकापूर येथे होणार आहे. मात्र, हा लोकार्पण सोहळा आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, रस्ता पूर्ण न होताच या रस्त्याचे लोकार्पण केलं जात असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.


नेमके आरोप काय?


45 किलोमीटर पर्यंतच्या रस्त्यामधील अनेक पुलांचे काम अपूर्ण आहे. तर अनेक ठिकाणी महामार्गाचे काम झाले नसून स्ट्रीट लाईट देखील अद्यापपर्यंत सुरु करण्यात आले नाही. शिवाय रस्त्यावर जर एखादे मोठे अपघात घडले तर या संदर्भात महामार्गावर काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप केला जात आहे. महामार्ग अपूर्ण असूनही टोल सुरु केल्याने फक्त टोल ठेकेदाराच्या भल्यासाठी हा लोकार्पण सोहळा लवकर उरकण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळं नितीन गडकरी यांची कंत्राटदार आणि स्थानिक नेत्यांकडून दिशाभूल केली जात असल्यानं नितीन गडकरी यांनी स्वतः आपल्या सूत्रांकडून हा रस्ता पूर्ण झाला आहे का? याबाबत तपासणी कररावी आणि त्यानंतरच रस्त्याचे लोकार्पण करावे अशी विनंती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नितीन गडकरी यांना केली.


नांदुरा-बुलढाणा या महामार्गावरील उड्डाण पुलाची उंची कमी


या महामार्गाचे काम करत असताना नांदुरा बायपासवरील नांदुरा-बुलढाणा या महामार्गावरील उड्डाण पुलाची उंची कमी ठेवली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या पुलाखालून उंच वाहने जात नव्हती. त्यामुळं ठेकेदाराने या पुलाखाली पाच फूट खड्डा खोदून पुलाखालून मार्ग बनवून दिला आहे. यामुळं पावसाचं पाणी या खोलगट भागात साचून मार्ग अनेकदा बंद पडत असल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : 'नवे रस्ते करायचे तेव्हा करा, मात्र आता खड्ड्याच्या त्रासातून मुक्त करा, नाशिककर संतापले!