18 September In History : एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या इजिप्त आणि इस्त्रायलने 18 सप्टेंबरला ऐतिहासिक अशा करारावर स्वाक्षरी (Camp David Accords) केली. इस्त्रायल आणि इजिप्त हे एकमेकांचे कट्टर शत्रू होते. पण या दोन देशांनी एकत्रित येऊन शांती करार केला. इजिप्तच्या अन्वर सादत यांच्या भूमिकेवर त्यावेळी अरबी राष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. तसेच आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये वेगळा ठसा उमटवणाऱ्या शबाना आझमी यांचा जन्म आजच्या दिवशीच झाला.
जाणून घेऊया 18 सप्टेंबरला इतिहासात काय घडलं होतं,
1180 - फिलिक ऑगस्टस फ्रान्सचा राजा बनला
1502 - ख्रिस्तोफर कोलंबस कोस्टारिकाच्या समुद्रकिनारी पोहोचला.
1810- चिलीने स्वत:ला स्वातंत्र्य देश घोषित केलं
चीली या लॅटिन अमेरिकेच्या देशाने स्पेनची गुलामगिरी झटकून स्वत:ला स्वातंत्र्य जाहीर केलं.
1812- मॉस्कोत आग, 12 हजार लोकांचा मृत्यू
सोव्हिएत रशियामध्ये आजच्या दिवशी 1812 साली एक भीषण आग लागली होती. त्यामध्ये तब्बल 12 हजार लोकांचा मृत्यू झाला. मॉस्कोतील या आगीमुळे अर्ध्याहून जास्त शहर जळून खाक झालं.
1851- द न्यूयॉर्क डेली टाईम्स या वृत्तपत्राची सुरुवात.
1899- बंगाली भाषेतील प्रसिद्ध लेखक आणि बंगाली सुधारणावादी राजनारायण बोस यांचे निधन.
1919- हॉलंडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
1947- भारतात राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम लागू
भारतात आजच्या दिवशी, 1947 साली राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम लागू करण्यात आला.
1950 शबाना आझमी यांचा जन्मदिवस
भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने वेगळा ठसा उमटवणाऱ्या शबाना आझमी (Shabana Azmi Birthday) यांचा आज जन्मदिवस आहे. शबाना आझमी या प्रसिद्ध शायर आणि गितकार कैफी आझमी यांच्या कन्या असून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या त्या पत्नी आहेत.
1978- इजिप्त आणि इस्त्रायलमध्ये शांती करार
एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या इस्त्रायल आणि इजिप्तमध्ये आजच्याच दिवशी, 1978 साली शांततेसंबंधी कॅम्प डेव्हिड करार (Camp David Accords) झाला. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती जिमी कार्टर यांनी या करारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अन्वर सदात आणि इस्रायलचे पंतप्रधान मेनाकेम बिगिन यांनी 17 सप्टेंबर 1978 रोजी कॅम्प डेव्हिड करारावर (Camp David Accords) स्वाक्षरी केली. या दोन देशांदरम्यान 12 दिवस गुप्त चर्चा झाली आणि नंतर हा करार अंमलात आणण्यात आला. या करारानंतर लगेच जानेवारी 1979 मध्ये या दोन देशांदरम्यान शांतता करारही (Egypt Israel Peace Treaty) झाला. इजिप्तने इस्त्रायलसोबत केलेल्या करारामुळे अरब राष्ट्रांना मोठा धक्का बसला. इस्त्रायसोबत अशा प्रकारचा करार करणारे इजिप्त हे पहिलेच अरब राष्ट्र होतं.
1986- महिला पायलटने पहिल्यांदाच विमानाचे उड्डाण केलं
आजच्या दिवशी भारतात पहिल्यांदाच एका महिला पायलटने विमानाचं उड्डाण केलं. मुंबई ते गोवा या मार्गावर हे उड्डाण करण्यात आलं.
1992- मोहम्मद हिदायतुल्ला यांचे निधन
भारताचे 11 वे सरन्यायाधीश आणि कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून काम केलेल्या मोहम्मद हिदायतुल्ला यांचे निधन झालं.
2009 आंतरराष्ट्रीय बांबू दिवस साजरा
जागतिक स्तरावर बांबूच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी 18 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय बांबू दिवस (World Bamboo Day) म्हणून साजरा करण्याचं जाहीर करण्यात आलं. 2009 साली ही घोषणा करण्यात आली. बांबूचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याच्या उत्पादनाला चालना देणे हे यामागचे उद्दिष्ट आहे. भारत चीननंतर बांबूचा सर्वात मोठा उत्पादक देश असून भारतात बांबूच्या 131 प्रजाती सापडतात.