मुंबई : आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद करण्यात आली होती. 16 जानेवारी 1681 रोजी छत्रपती संभाजीराजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला.  समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ आणि न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांचे निधन झाले होते. भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2003 रोजी रवाना झाली. बंगाली साहित्यिक शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे देखील आजच्याच दिवशी निधन झाले होते. इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या घटना घडल्या त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.  


1681 :  छत्रपती संभाजी राजे यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला


छत्रपती संभाजी राजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी होते. त्यावेळी मराठ्यांचा सर्वात शक्तिशाली शत्रू मुघल सम्राट औरंगजेब याने भारतातून विजापूर आणि गोलकोंडाची सत्ता संपुष्टात आणण्यात मोठी भूमिका बजावली. संभाजी राजे यांनी सलग नऊ वर्षे औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला त्यामुळे 16 जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. 


1901 :  न्यायमूर्ती  महादेव गोविंद रानडे यांचे निधन


न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 रोजी झाला. ते ब्रिटिशकालीन भारतीय न्यायाधीश, लेखक आणि समाजसुधारक होते. रानडे यांचा जन्म महाराष्ट्रातील नाशिकमधील निफाड या छोट्याशा गावात झाला. त्यांचा जन्म निफाड येथे झाला असला तरी त्यांचे सुरुवातीचे आयुष्य कोल्हापुरात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात त्यांचे शिक्षण सुरू झाले. 1873 मध्ये त्यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट, बॉम्बे स्मॉल कॉज कोर्टाचे चौथे न्यायाधीश नियुक्ती करण्यात आली. 1885 पासून ते उच्च न्यायालयात रुजू झाले. ते मुंबई विधान परिषदेचे सदस्यही होते. 1893 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.  त्यांचे निधन 16 जानेवारी 1901 रोजी झाले.   


1938 : प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरतचंद्र चट्टोपाध्याय यांचे निधन


सरतचंद्र चट्टोपाध्याय  यांचा जन्म 15 सप्टेंबर 1876  रोजी झाला. ते बंगाली कादंबरीकार आणि लघुकथा लेखक होते. ते सर्वात लोकप्रिय बंगाली कादंबरीकार होते. याशिवाय तत्कालीन बंगालच्या समाजजीवनाची झलक त्यांच्या कलाकृतींतून पाहायला मिळते. शरतचंद्र हे भारतातील सर्वकाळातील सर्वात लोकप्रिय आणि अनुवादित लेखक आहेत.  16 जानेवारी 1938 रोजी त्यांचे निधन झाले. 



1954  :  चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे निधन 


बाबूराव पेंटर यांना एक उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर भारतीय चित्रपट सृष्टीत यांनी मोलाची कामगिरी बजावली. चित्रकला, चित्रपटनिर्मिती, चित्रपटदिग्दर्शन, रेखाटन, शिल्पकला, प्रकाशचित्रण या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी एक वेगळाच ठसा उमटवला. भारतीय चित्रपटातील एक उत्कृष्ट दिग्दर्शन म्हणून यांना ओळखले जाते. शिल्पकलेच्या कामासाठी यांनी स्वतःचा कारखाना सुरू केला होता. शिल्पकलेबरोबरच त्यांनी चित्रकला अवगत होती. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी शिल्पे कोल्हापूरमध्ये तयार केली आहेत. 


1992 : भारत आणि ब्रिटनमध्ये प्रत्यार्पण करार


अलीकडच्या काळात आंतरराष्ट्रीय समुदायातील प्रत्येक देश आर्थिक दृष्ट्या इतर देशांवर जास्त प्रमाणात विसंबून आहे. सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या मार्गावर असल्यामुळे एका देशात आर्थिक गुन्हा केला असेल तर त्याचा परिणाम दुसर्‍या देशावरही होतो. कारण सर्वच देश विश्व व्यापार संघटनेचे सदस्य आहेत. सगळ्या देशांना समान आर्थिक, व्यापारी नियम लागू आहेत. त्यामुळेच मागील काळात जी 20 परिषदेच्या बैठकीत भारताने जाणीवपूर्वक याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. ज्या व्यक्ती एका देशातून आर्थिक गुन्हे करून पळून जातात अशा गुन्हेगार व्यक्तीला त्या देशांनी तात्काळ मायदेशी पाठवले पाहिजे. कारण हा प्रकार प्रत्येक देशाबाबत घडू शकतो. आज तशी स्थिती नसल्यामुळेच या गुन्हेगारांचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. विशेषतः, ब्रिटेनसारखा देश तर गुन्हेगारांचे नंदनवनच बनत चालला आहे. अनेक देशातील गुन्हेगार आर्थिक किंवा अन्य स्वरुपाचे गुन्हे करून इंग्लंडमध्ये पळून जातात. तेव्हा त्यांच्या प्रत्यापर्णासाठी वर्षानुवर्ष लागतात. 1992 मध्ये इंग्लंड- भारत यांच्यात प्रत्यार्पणाचा करार झाला आणि तो 1993 मध्ये अस्तित्वात आला.  



2003 : भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी रवाना झाली


भारतीय वंशाची कल्पना चावला दुसऱ्या अंतराळ प्रवासासाठी आजच्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी 2003 रोजी रवाना झाली. संपूर्ण जग भारतीय मुलीच्या उल्लेखनीय कामगिरीचा साक्षीदार आहे. कल्पना चावलाने अमेरिकेत जाऊन अंतराळवीर होण्याचे स्वप्न पूर्ण केले. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने तिची अंतराळ प्रवासासाठी दोनदा निवड केली. कल्पनाने स्पेस शटल कोलंबियामधून दुसऱ्यांदा अंतराळात झेप घेतली होती.  दुर्देवाने हे उड्डाण तिचे शेवटचे ठरले. कारण 1 फेब्रुवारी रोजी त्यांचे अंतराळ यान क्रॅश झाले. 16 दिवसांच्या अंतराळ मोहिमेनंतर पृथ्वीवर परत आले आणि सहा इतर क्रू सदस्यांसह तिचा मृत्यू झाला.


इतर महत्त्वाच्या घडामोडी


1943 : अमेरिकन हवाई दलाचा इंडोनेशियातील अँबोन बेटावर हवाई हल्ला 
1969 : सोव्हिएत अंतराळयान 'सोयुझ 4' आणि 'सोयुझ 5' प्रथमच अंतराळात सदस्यांची देवाणघेवाण झाली 
1996 : हबल स्पेस टेलिस्कोपच्या शास्त्रज्ञांनी अवकाशात 100 हून अधिक नवीन आकाशगंगा शोधल्याचा दावा केला  
2006 : समाजवादी नेत्या मिशेल बॅचेलेट यांची चिलीच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी निवड