गडचिरोली : तेंदूपान ठेकेदारांच्या मनमानीला उत्तर देत गडचिरोली जिल्ह्यातील 169 ग्रामसभांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तेंदूपानांचं संकलन करुन थेट कंपनीत विकण्याचं गडचिरोलीतील ग्रामसभांनी ठरवलं आहे. यातून दलालांना मिळणारा अतिरिक्त फायदा आता ग्रामसभांना मिळेल आणि कोटींचा नफाही कमावता येईल. गडचिरोलीतील ग्रामसभांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण देशात पहिलाच निर्णय असल्याचे बोलले जात आहे.


गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात तेंदूपानांचे संकलन केले जाते. राज्यातील सर्वाधिक वनक्षेत्र म्हणजे 78% वनक्षेत्र गडचिरोलीत आहे. या वनात मोठ्या प्रमाणात तेंदूची झाडे आहेत.

राज्यपालांच्या आदेशाने पेसा कायद्याअंतर्गत ग्रासभेला तेंदू संकलनाचे सर्वाधिकार दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ग्रामसभा तेंदू संकलन करून ठेकेदारांना विकायचे. मात्र जास्त फायद्यासाठी ठेकेदार मिलीभगत करून तेंदूपानाच्या गोणीची किंमत कमी केली. तसेच जास्त तेंदूपानांचे उत्पादन होण्यासाठी जंगलात आग लावीत होते. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात जंगलाचे नुकसान होत होते. जंगलाचे नुकसान होऊ नये आणि या हंगामातून ग्रामस्थांना जास्त उत्पादन व्हावे, यासाठी ग्रामसभेने पुढाकार घेऊन स्वतः तेंदू संकलन करून ते थेट कंपनीत विकत आहेत. त्यामुळे या ग्रामसभेला कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.



जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली आणि धानोरा तालुक्यातील 169 गावातील ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदूपत्ता संकलन केला गेला. यापूर्वी तीनवेळा लिलाव प्रक्रिया केली गेली. मात्र या लिलाव प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या ठेकेदारांनी मिलीभगत करून प्रति गोणींचा भाव 7 ते 8 हजार रुपये देण्याचे ठरवले. मात्र ग्रामसभेने या गोणींचा भाव 13 ते 16 हजारापर्यंत विकण्याचा ठरवलं होतं.

तसेच जंगलात आग न लावण्याची ठेकेदारांना ग्रामसभेची अट मान्य नव्हती. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील 43 यूनिटमधील तेंदूपान संकलन ग्रामस्थांनी स्वतः करून ते ठेकेदारांना न विकत थेट बिडी कंपनीमध्ये विकण्याचा निर्णय केला आहे.

विशेष म्हणजे ठेकेदारांना ठेका दिल्यावर ग्रामसभांना प्रति गोणींची रक्कम दिली जात होती. मात्र आता थेट बिडी कंपनीत तेंदूपत्ता विकल्याने ग्राम सभेच्या ग्रामकोषात करोडो रुपये जमा होतील. जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त आणि मागास असलेल्या पेंडरी,घोटसूर,आरेवाडा, लाहेरी व कियर इत्यादी ग्रामसभांमध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून तेंदू संकलन केला गेला. त्यामुळे थेट कंपनीत तेंदूपान विकून येथील ग्रामस्थ लखपती तर ग्रामसभा करोडपती बनणार आहेत. त्यातून या भागाचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.