15th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजच्या दिवसाचे ही महत्त्व आहे. सांस्कृतिक, साहित्यिक आणि समाजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाने छाप सोडणारे बालगंधर्व यांचा आज स्मृतीदिन आहे. र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता. विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. 


जागतिक युवा कौशल्य दिन 


दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन (World Youth Skills Day) तरुणांच्या क्षमता आणि कौशल्यांवर प्रकाश टाकण्यासाठी साजरा केला जातो. तरुणांना रोजगार, सन्माननीय नोकऱ्या आणि उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये उपलब्ध करून देण्याचे धोरणात्मक महत्त्व ओळखण्यासाठी, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 2014 मध्ये 15 जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. 


1904:  शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा जन्म


मोगुबाई कुर्डीकर या हिंदुस्तानी संगीतातील मराठी गायिका होत्या. त्या जयपूर-अत्रौली घराण्याच्या शैलीत गायन करत असत. त्यांना आग्रा घराणे व जयपूर-अत्रौली घराणे ह्या दोन मातब्बर संगीत घराण्यांच्या शैलीतील संगीत शिकायला मिळाले. मोगूबाई या 'गानतपस्विनी' या उपाधीने ओळखल्या जातात.  मोगूबाईंची गायकी ही लयकारी व बोलतानांवर आधारलेली होती. स्वर व लयीची सुंदर गुंफण त्यांच्या गायनात आढळत असे. त्यांच्या गायन कार्यक्रमांना व मैफिलींना रसिकांची दाद मिळाली. 1969 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच भारत सरकारने 1974 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.1980 मध्ये त्यांना संगीत संशोधन अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. 


मोगूबाईंनी अनेक समर्थ शिष्यांना गायनकलेत तयार केले. त्यांत प्रामुख्याने त्यांच्या कन्या गानसरस्वती किशोरी आमोणकर, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, कौसल्या मंजेश्वर, सुहासिनी मुळगांवकर, पद्मा तळवलकर, बबनराव हळदणकर आदींचा समावेश आहे. 


1926: देशात पहिल्यांदा मुंबईत सार्वजनिक वाहतुकीसाठी बस सेवा सुरू 


आजच्या दिवशी सार्वजनिक वाहतुकीसाठी बससेवा मु्ंबईत सुरू करण्यात आली. बेस्टची पहिली बस 15 जुलै 1926 मध्ये अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर धावली. मुंबईकरांनी या सेवेचे जोरदार स्वागत केले. पण त्या काळात ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. तर, बससेवा ही उच्चभ्रू लोकांसाठी असल्याचे समजले जाई. 


बॉम्बे ट्रामवे कंपनी आणि मुंबई नगरपालिका यांमध्ये "बॉम्बे ट्रामवे 1874" नावाचा करार झाला. त्यानुसार कंपनीला घोड्यांनी ओढायच्या ट्राम चालवण्याची परवानगी मिळाली. त्यानंतर 1905 मध्ये बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड हिने बॉम्बे ट्रामवे कंपनी विकत घेतली आणि मुंबईच्या रस्त्यांवरून विजेवर चालणार्‍या ट्राम धावू लागल्या. ट्रामला जास्त गर्दी होत असल्याने 1920 मध्ये डबलडेकर ट्राम चालवायला सुरुवात केली. त्यानंतर पुढे 1926 मध्ये बेस्टची बस सेवा सुरू झाली. 



1927: र. धों. कर्वे यांच्या समाजस्वास्थ्य मासिकाचा पहिला अंक प्रकाशित 


संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेवून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी 15 जुलै 1927 रोजी 'समाजस्वास्थ्य' मासिकाची सुरुवात केली. समाजाच्या कट्टर विरोधाला तोंड देत या मासिकाने 27 वर्षे अखंड वाटचाल केली. 


लैंगिक संबंध, कामप्रेरणा, कुटुंबनियोजन असे नुसते शब्दसुद्धा चारचौघात उच्चारण्यास समाजमान्यता नव्हती त्या काळात रघुनाथ धोंडो कर्वे यांनी आपल्या 'समाजस्वास्थ्य' मासिकाद्वारे या विषयांची खुली चर्चा केली. कामव्यवहाराबाबत अज्ञानी असलेल्या समाजाचे स्वास्थ्य धोक्यात येते असे ठणकावून सांगत कामप्रेरणा, समागम, कुटुंबनियोजनाच्या पद्धती, प्रजनन, स्त्रियांचे विकार, स्त्रीपुरुष संबंध आणि समाजव्यवहार असे विषय त्यांनी धाडसीपणे हाताळले.  तत्कालीन समाजाच्या कुचेष्टेचे आणि उपहासाचे धनी झालेल्या र. धों.च्या कार्यात त्यांच्या पत्नी मालतीबाई यांचीही साथ होती. 


1932: विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा जन्म


नरहर कुरुंदकर हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. आचार्य नरहर कुरुंदकर हे एक बहुआयामी, स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व होते, गुरुजी म्हणून संपूर्ण मराठवाड्यात प्रसिद्ध होते. एक आदर्श शिक्षक, प्राचार्य, तत्त्वज्ञ, संशोधक, समीक्षक, वक्ते, लेखक आणि मार्गदर्शक म्हणून समाजाला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झटले. कोणताही विषय त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेर नव्हता. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून फ्रॉइडच्या मानवी मानसशास्त्रापर्यंत आणि शंकराचार्यांच्या द्वैत तत्त्वज्ञानापासून मार्क्सवादापर्यंतच्या विस्तृत विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते.


अध्यापनाची कारकीर्द 1955 मध्ये नांदेड येथील प्रतिभा निकेतनमध्ये सुरू झाली. पुढे 1963 मध्ये ते नांदेड येथील पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक झाले. मराठी आणि राज्यशास्त्र या विषयावरील शोधनिबंधांचे ते बाह्य परीक्षकही होते. इतिहास, संगीत, संस्कृत, काव्य, साहित्य या विषयांच्या संशोधनासाठी त्यांनी अनौपचारिक मार्गदर्शन केले. पीपल्स कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी कुशलतेने पार पाडली.


त्यांच्या वक्तृत्वशैलीतील काही असामान्य वैशिष्टय़े म्हणजे अत्यंत कठीण विषयांचे विविध प्रकार सोप्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची क्षमता, अगदी गंभीर विषयातही विनोदाचा वापर करणे आणि चतुराईचा वापर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे. व्यंग या शैलीचा वापर करून त्यांनी विविध कठीण विषयांवर आणि विचारांवर समाजाचे प्रबोधन केले.


त्यांच्या वक्तृत्वशैलीतील काही असामान्य वैशिष्टय़े म्हणजे अत्यंत कठीण विषयांचे विविध प्रकार सोप्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याची त्यांची क्षमता, अगदी गंभीर विषयातही विनोदाचा वापर करणे आणि चतुराईचा वापर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे. व्यंग या शैलीचा वापर करून त्यांनी विविध कठीण विषयांवर आणि विचारांवर समाजाचे प्रबोधन केले.


1967:  अभिनेते, गायक, नाट्यनिर्माते बालगंधर्व यांचे निधन 


ज्या काळात स्त्रियांना रंगमंचावर अभिनय सादर करण्यास समाज मान्यता नव्हती त्याच काळात स्त्री भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणाऱ्या नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा आज स्मृतीदिन. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील मराठी रंगभूमीवरील अभिनेता, गायक आणि नाट्यनिर्माते होते. बालगंधर्व हे भास्करबुवा बखले यांचे शिष्य आणि मास्तर कृष्णरावांचे गुरूबंधू होत. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे गाणे ऐकून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. पुढे ते त्याच नावाने लोकप्रिय झाले. 


बालगंधर्वानी आपल्या भूमिका साकारून संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हे कलाप्रकार मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबांमध्ये लोकप्रिय केले. नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, काकासाहेब खाडिलकर, राम गणेश गडकरी आणि वसंत शांताराम देसाई आदींनी लिहिलेली अनेक संगीत नाटके बालगंधर्वांनी केली.


भाऊराव कोल्हटकरांचे 1901 मध्ये निधन झाल्यानंतर संगीत नाटक परंपरेला उतरती कळा आली होती. त्यानंतर बालगंधर्वांनी या परंपरेत मोलाची भर घालत ती पुढे नेण्याचे महत्त्वाचे कार्य केले.1929 सालच्या 42 व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.


संगीत सौभद्र, संगीत मृच्छकटिक, संगीत शाकुंतल, संगीत मानापमान, संगीत संशयकल्लोळ, संगीत शारदा, संगीत मूकनायक, संगीत स्वयंवर (नाटक), संगीत विद्याहरण, संगीत एकच प्याला, संगीत कान्होपात्रासह एकूण 25 विविध नाटकांत भूमिका केल्या. त्यांची संगीत शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. 1955 रोजी त्यांनी एकच प्याला नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. 



इतर महत्त्वाच्या घटना 


1542 : लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन
1916 : साली जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंग ची स्थापना करण्यात आली.
1955 : पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर
1996: पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
1997: पर्यावरणवादी महेशचंद्र मेहता यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.