15th July Headline : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यावेळी ते संयुक्त अरब अमिरातच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर  उर्जा, शिक्षा, आरोग्य, सुरक्षा या विषयांवर चर्चा करणार आहेत. तर नाशिकमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे नाशिकमध्ये असणार आहेत. नाशिकमध्ये अजित पवार शक्तीप्रदर्शन देखील करणार आहेत. हवामान खात्याकडून राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला हवामान खात्याकडून रेड अलर्ड जारी करण्यात आला आहे. 


पंतप्रधान मोदी संयुक्त अरबच्या दौऱ्यावर


 फ्रान्सच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त अरब अमिरातच्या दौ-यावर  जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यूएईचे राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान ते  उर्जा, शिक्षा, आरोग्य, सुरक्षा या विषयांवर यूएईच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. 


काँग्रेसच्या संसदीय बोर्डाची बैठक


संसदेच्या आगामी अधिवेशनासंदर्भात चर्चा  करण्यासाठी काँग्रेस संसदीय बोर्डाची बोलावण्यात आली आहे. ही बैठक  सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी होणार आहे. 


नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम 


नाशिकमधे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उदय सामंत, गिरीश महाजन, उदय सामंत दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. 


नाशिकमध्ये अजित पवारांचं शक्तीप्रदर्शन


अजित पवार हे नाशकात असणार आहेत. तर शक्ती प्रदर्शन करत नाशिक रोडपासून अजित पवार यांची बाईक रॅली नाशिक विश्रामगृहापर्यंत निघणार आहे.


अनिल देशमुख अमरावती दौऱ्यावर


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विदर्भाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे  अमरावती आणि अकोल्याच्या दौ-यावर आहेत. राष्ट्रवादीत झालेल्या नाट्यमय घडामोडी नंतर अनिल देशमुख यांचा दौरा महत्वाचा मानला जात आहे. अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा होणार आहे.  


राज्यात मुसळधार पावसाचा इशारा 


पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर मुंबईतही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र तसेच, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.याचबरोबर संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.