14 February Headlines: सुप्रीम कोर्टात आज राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट कोणते निर्देश देणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सर्वोच्च बलिदान दिलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. राज्यासह देशभरात व्हेलेंटाइन डे निमित्ताने विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस सतर्क असणार आहेत. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार असून मोठे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
दिल्ली
- महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार असून राज्याच्यादृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. आजच्या सुनावणीत हे प्रकरण पाच ऐवजी सात न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे सोपवलं जाणार का? आजच्या सुनावणीत हे प्रकरण 'डे टु डे' सुनावणीसाठी घेणार का यावर निर्णयाची शक्यता आहे.
मुंबई
- राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक होणार आहे. महत्त्वाच्या तीन विकास आराखड्यांचाही सादरीकरण केले जाणार आहे. त्याशिवाय, मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णयही अपेक्षित आहेत.
- साल 2002 च्या घाटकोपर बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी ख्वाजा युनूसच्या कोठडी मृत्यूप्रकरणी त्या चार पोलिसांना पुन्हा आरोपी करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका करण्यात आली आहे. युनूसची आई आसिया बेगमच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवर आज सुनावणीची शक्यता आहे.
- जमीन जिहाद विरोधात आज चेंबूर येथे भाजपचे आणि सकल हिंदू समाज चेंबूरच्यावतीने आज आंदोलन होणार आहे. आमदार नितेश राणे हे या आंदोलनात मुख्य वक्ते असणार आहेत.
- दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते “महिम ज्युवेनाइल स्पोर्ट्स क्लब-शिवाजी पार्क जिमखाना” आयोजित महिलांच्या टी-20 क्रिक्रेट सामन्याचे उद्घाटन होणार आहे
- आज प्रेमाचा दिवस... हा दिवस जगभरात व्हेलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. राज्यभरातही आज दिवसभर अनेक ठिकाणी विविध उपक्रम, कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसही सतर्क असणार आहेत.
ठाणे
- केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन भाजप करणार आहे.
पुणे
- कसबा आणि चिंचवड निवडणूकीत आता रंग येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांकडून प्रचारांचा धडाका सुरू आहे. चिंचवड आणि कसब्यात महाविकास आघाडीचे नेते तळ ठोकून आहेत. काही दिवसांपूर्वी एकमेकांबद्दल बोलणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यानिमित्तानं प्रचारात एकत्र फिरताना दिसत आहेत.
रत्नागिरी
- शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत पत्रकार शशिकांत वारीसे यांच्या संशयास्पद अपघाती मृत्यू प्रकरणात रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची भेट घेणार आहेत.
नाशिक
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत दोन दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. संजय राऊत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
नागपूर
- बजरंग दल, नागपूर महानगरच्या वतीने व्हॅलेंटाइन डे च्या विरोधात चेतावनी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली छावणी दुर्गा माता मंदिर, काटोल रोड इथून निघणार आहे
पालघर
- शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आज वसई तालुक्यात येत असून विविध ठिकाणी त्यांचा दौरा आहे.
चंद्रपूर
- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्याला दानवे संबोधित करणार आहेत.