13th September In History : आज इतिहासात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांचे तुरुंगातील उपोषणात 63 व्या दिवशी निधन झाले. तर, भारत सरकारने हैदराबाद संस्थानावर पोलीस कारवाई सुरू केली. भारतीय लष्कराने पहिल्या तासातच तुळजापूर सर केले. भारतीय कवी आणि विचारवंत सज्जाद झहीर यांचा स्मृतीदिनही आज आहे.
1929: क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांचे तुरुंगातील उपोषणात 63 व्या दिवशी निधन
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारी संघटनेचे क्रांतिकारक जतिंद्रनाथ दास यांचा आज स्मृतीदिन. भगत सिंग आणि इतर क्रांतीकारकांसोबत जतिंद्रनाथ दास यांना लाहोर कटात अटक करण्यात आली होती. तुरुंगात सुरू असलेल्या भेदभावाविरोधात, अमानवीय वागणुकीविरोधात भगत सिंह आणि इतर क्रांतिकारकांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. यामध्ये जतिंद्रनाथ यांचाही सहभाग होता. ब्रिटिशांनी हे उपोषण मोडून काढण्यासाठी क्रांतिकारकांवर बळाचा वापरही केला. मात्र, उपोषण सुरूच राहिले. या उपोषणादरम्यान प्रकृती ढासळल्याने जतिंद्रनाथ दास यांचे 63 व्या दिवशी निधन झाले.
1948 : हैदराबाद संस्थानावर भारतीय लष्कराची चढाई, पहिल्या तासात तुळजापूर सर
हैदराबाद मुक्तीसंग्रामाची अखेर पोलिस कारवाईने झाली. निजामी शासनसत्तेचा प्रतिकार 109 तासात संपुष्टात आला. ही पोलीस कारवाई म्हणजे लष्करी कारवाई होती. तिला 'ऑपरेशन पोलो' नाव दिले होते. त्याआधी सीमेवर घुसखोरी करणाऱ्या निजामी लष्कर व रझाकारी टोळ्यांविरुद्ध 'ऑपरेशन कबड्डी' चालवण्यात आले.
1948 च्या ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ऑपरेशन पोलोची तयारी सुरू झाली. या मोहिमेसाठी फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले तैनात केली होती. या लष्कराला हवाई दलाचे व रणगाड्यांचे सहाय्य होते. सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह हे पुण्याच्या मुख्यालयातून सर्व सूत्रे हलवीत होते. वेगवेगळ्या विभागांसाठी दलप्रमुख होते.
13 सप्टेंबर, 1948 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भारताची कारवाई सुरू झाली. पहिल्या तासातच तुळजापूर सर झाले. नळदुर्गला जोरदार प्रतिकार झाला. तेथील पूल निजामी सैन्याने उडवून देण्यापूर्वीच भारतीय लष्कराने कब्जात घेतला. भारतीय लष्कराने औरंगाबादच्या बाजूला जालना रस्त्याने मुसंडी मारली. परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव जिंकले. कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात आला. आदिलाबाद भागात बल्लारशहाचा पूलही ताब्यात आला. वरंगळ व बीदरच्या विमानतळांवर बाँबफेक केली.
1973 : भारतीय कवी आणि विचारवंत सज्जाद झहीर यांचे निधन
उर्दू के एक प्रसिद्ध लेखक और मार्क्सवादी विचारवंत सज्जाद झहीर यांचा आज स्मृतीदिन. सज्जाद झहीर यांनी मुल्कराज आनंद आणि ज्योतिर्मय घोष यांच्यासह 1935 मध्ये लंडनमध्ये प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन (Progressive writer's association) या संघटनेची स्थापना केली. सज्जाद जहीर या दरम्यानच्या काळात परदेशातील डाव्या चळवळीत, विचारवंतांमध्ये कार्यरत होते. स्पेनमधील फॅसिझमविरोधी लढ्यात त्यांनी सहभाग नोंदवला होता. 1936 मध्ये भारतात आल्यानंतर त्यांनी ‘प्रगतिशील लेखक संघ’चा स्थापना करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ‘प्रगतिशील लेखक संघाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान मुन्शी प्रेमचंद यांनी भूषवले. ‘प्रगतिशील लेखक संघ’च्या माध्यमातून देशात सांस्कृतिक चळवळ उभी राहिली. या चळवळीने स्वातंत्र्य लढ्यातही योगदान दिले. या दरम्यान सज्जाद जहीर हे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य झाले. उत्तर प्रदेशच्या राज्याचे सचिव म्हणून त्यांनी काही वर्ष जबाबदारी सांभाळली.
भारताची फाळणी झाल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचे काम वाढवण्यासाठी पक्षाच्या आदेशाने जहीर हे पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानमध्ये त्यांची 'पाकिस्तान कम्युनिस्ट पक्षा'चे सरचिटणीस म्हणून निवड झाली. तेथे त्यांनी विद्यार्थी, कामगार आणि कामगार संघटनांच्या संघटनेची जबाबदारी घेतली. पण पाकिस्तानातही परिस्थिती त्यांच्या मनासारखी नव्हती. त्यावेळच्या कट्टरतावादी सरकारमुळे सज्जाद झहीरने तिथेही भूमिगत काम केले. काही काळानंतर पाकिस्तान सरकारने सज्जाद झहीर, प्रसिद्ध कवी फैज अहमद फैज, कवी अहमद फराज, रझिया सज्जाद झहीर आणि काही पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांना रावळपिंडी कट प्रकरणात अटक केली. त्यांच्यावर सरकारविरोधात उठाव करून सत्ता ताब्यात घेण्यााचा आरोप ठेवण्यात आला. सज्जाद झहीर, फैज अहमद फैज, अहमद फराज यांना मोठ्या शिक्षा सुनावण्यात आल्या. पुढे त्यांच्याविरोधातील कारवाईविरोधात भारत आणि इतर देशांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. देशातंर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या दबावामुळे पाकिस्तान सरकारने आरोपींची सुटका केली. त्यानंतर सज्जाद जहीर भारतात आले आणि इथले नागरिकत्व स्वीकारले.
झहीरच्या कथा आणि लेखन प्रचलित सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संस्था आणि आर्थिक विषमतेचा निषेध करतात. त्यांचे लेखन लैंगिक दडपशाहीवर प्रकाश टाकते, जे प्रत्यक्षात धर्म-आधारित निर्बंधांचा परिणाम आहे. जहीर यांना कट्टरतावाद्यांचा विरोध सहन करावा लागला.
1985 : सुपर मारियो व्हिडीओ गेम जपानमध्ये प्रकाशित
90 च्या दशकात सुपर मारियो ब्रदर्स हा व्हिडीओ गेम जपानमध्ये प्रकाशित झाला. या गेम्सची सुपर मारिओ मालिका सुरू झाली. 90 च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला या खेळाचे वेड लागले होते. हा व्हिडीओ गेम 13 सप्टेंबर 1985 रोजी रिलीज झाला. गेम शिगेरू मियामोटो यांनी डिझाइन केला होता आणि निन्टेन्डोने प्रकाशित केला होता. नंतरच्या काळात सुपर मारिओ गेममध्ये काळानुरुप बदल होत गेले.
2008: दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट, चार स्फोटात 30 ठार, 130 जण जखमी
13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीत 30 मिनिटांच्या अंतराने चार ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. याममध्ये 30 जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास 130 लोक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस आणि करोलबागमधील गफ्फार मार्केट तसेच गजबजलेले ग्रेटर कैलास येथे स्फोट घडवून आणले. या साखळी बॉम्बस्फोटाने राजधानी दिल्लीसह देश हादरला होता.
इतर महत्त्वाच्या घटना
1893: पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक मामा परमानंद यांचे निधन
1898 : हॅनीबल गुडविन यांनी सेल्यूलॉइड फोटोग्राफिक फिल्म चे पेटंट घेतले.
1932: शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्म.
1969: ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर शेन वॉर्न यांचा जन्म
1975: भारतीय गायक आणि संगीतज्ञ मुदिकॉन्दाम वेंकटरम अय्यर यांचे निधन
1997: प्रसिद्ध गीतकार लालजी पांडेय तथा अंजान यांचे निधन
2004: गर्भनिरोधक गोळी चे संशोधक लुइस ई. मिरमोंटेस यांचे निधन
2012: भारताचे 21 वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचे निधन