मुंबई: सनातम धर्मावर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या पुत्रावर, उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांच्यावर मिरा रोडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम 153 ए आणि 295 ए अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वहिंदू परिषदेचे भाईंदरचे पदाधिकारी रुपेश दुबे यांच्या तक्रारीनंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत दिलेल्या वादग्रस्त भाषणामुळे वाद निर्माण झाला आहे. उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र भाईंदर येथील विश्व हिंदू परिषदेच्या शिष्टमंडळाने 10 ऑगस्ट रोजी मीरा रोड पोलिसांना दिले होते. मीरा रोड पोलिसांनी सदर निवेदन घेतले. त्यावेळी हे कागदपत्र सहाय्यक संचालक, सरकारी वकील यांच्याकडे कायदेशीर सल्ल्यासाठी पाठवले गेले. 


विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी रुपेश दुबे हे त्यांच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांसह 11 ऑगस्ट रोजी मीरा रोड पोलिस ठाण्यात आले. त्यावेळी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने 2 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर या कालावधीत पाळण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी न केल्यामुळे, सार्वजनिक शांतता बिघडवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी त्यांना कायदेशीर कारवाईची नोटीस बजावली होती. 


अखेर गुरुवारी रात्री उशिरा मीरा रोड पोलिसांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्याविरुद्ध कलम 153 अ आणि 295 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मीरा रोडचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांनी सांगितले.
 
रूपेश दुबे आणि त्यांचे कार्यकर्ते प्रकाश राज, ए राजा, प्रियांक खर्गे यांच्यावरही एफआरआय नोंदवण्याची मागणी करत होते. पोलिसांनी केवळ उदयनिधी स्टॅलिन यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे.


काय म्हणाले उदयनिधी स्टॅलिन?


उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही. त्या संपवल्याच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण डेंग्यू, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. त्याला संपवलच पाहिजे. तसेच, सनातन धर्मालाही संपवायचं आहे. 


उदयनिधी स्टॅलिन वक्तव्यावर ठाम


उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका  झाल्यानंतर त्यांनी आपल्या  वक्तव्यावर  ठाम असल्याचं सांगितलं आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी म्हटलं, सनातन धर्माला मानणाऱ्यांना संपवण्याची भाषा मी केली नाही. माझ्या वक्तव्याबाबत कोणत्याही कायदेशीर गोष्टींना सामोरं जाण्यासाठी मी तयार आहे. 


ही बातमी वाचा: