मुंबई : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील उंबरे गावातील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांचा अखेर 14 महिन्यांचा थकीत पगार मिळाला आहे. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिल्यानंतर पगार देण्यास सुरुवात केली होती. मात्र आता थकित पगारही शिक्षकांना मिळाला आहे.

पटसंख्या कमी असल्याचं कारण दाखवत आदिवासी विकास विभागाकडून या शाळेतील सर्व शिक्षकांचा पगार तब्बल 14 महिन्यांपासून रोखण्यात आला होता. शिक्षकांनी अनेकदा मागणी करुनही त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. एबीपी माझाने याबाबतचं वृत्त दिल्यानंतर शिक्षकांना नियमित पगार देण्यास सुरुवात करण्यात आली होती.

मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांना दोन टप्प्यांमध्ये 14 महिन्यांचा पगार देण्यात आला. 14 महिने या शिक्षकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. तसेचं बँकेचे हफ्ते थकल्याने अनेकांनी जप्तीची नोटीस देखील बँकेने बजावली होती. आता पगार मिळाल्याने सर्वच शिक्षकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

काय आहे प्रकरण?

उंबरे गावातील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांसह 13 शिक्षकांचा पगार 14 महिन्यांपासून रोखण्यात आला होता. या शाळेत शिकवणाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती.

पटसंख्या कमी असल्यामुळे शिक्षकांचा पगार बंद करण्यात आल्याचं आदिवासी विकास विभागाकडून सांगण्यात येत होतं. विशेष म्हणजे ही शासकीय अनुदानित शाळा आहे. संबंधित विभागाकडून पगार दिला जाईल, एवढंच आश्वासन शिक्षकांना दिलं जात होतं. मात्र 14 महिने या शिक्षकांना पगारापासून वंचित रहावं लागलं.

आदिवासी आश्रमशाळेचे शिक्षक 14 महिन्यांपासून पगाराविना