रत्नागिरी : खासदारांच्या बनावट लेटरहेडचा वापर करत जिल्ह्यांच्या नियोजन मंडळांना फसवणारा  भामटा रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. भाजपाचे राज्यसभेचे खासदार अजय संचेती यांच्या बनावट पत्राचा वापर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी संतोष नारायणकर याला अटक केली आहे.


खासदारांच्या बनावट पत्रांच्या माध्यमातून रत्नागिरीच्या जिल्हा नियोजन मंडळाला लाखो रुपयांची कामे सूचवण्यात आली होती. खासदारांचे पत्र असल्याने नियोजन मंडळाने त्यावर कार्यवाही सुरु केली. पण निधी उपलब्धतेबाबत जेव्हा चर्चा झाली, तेव्हा खासदारांचं हे पत्र बनावट आल्याचे समोर आले.

खासदार अजय संचेती यांच्या नावाचे बनावट पत्र तयार करुन रत्नागिरीतल्या जिल्हा नियोजन मंडळाला दहा कामे सूचवण्यात आली होती. ई-मेलच्या माध्यमातून खासदारांचे लेटरहेड वापरून ही कामे सुचवली गेली होती. कामांना मंजुरी देत यासाठी खासदार निधीतून लागणाऱ्या पैशाचा विषय ज्यावेळी पुढे आला. त्यावेळी हा सारा बनाव उघड झाला होता.

स्वतः खासदार संचेती यांनी अशी कुठलीच कामं जिल्हा नियोजनला सूचवली नसल्याचा खुलासा रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यानंतर या मागचा बनाव उघड झाला. रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झालेल्या या भामट्याचा शोध गेले काही दिवस रत्नागिरी पोलिस घेत होते.

अखेर या सगळ्यांच्या मागे केवळ केवळ 12 वी पास असलेला  संतोष नारायणकर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. रत्नागिरी पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतला असून, त्याने राज्यातल्या अनेक लोकप्रतिनिधींच्या अशा बनावट पत्रांच्या आधारे किती ठिकाणी गोंधळ घातला आहे याचाही आता शोध घेतला जात आहे.