मुंबई : जगाच्या आणि भारताच्या इतिहासात आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. या घटनांना ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहेत. आजच्याच दिवशी आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज हे सुखरुप राजगडावर पोहचले होते. तर हैदराबाद मुक्तिसंग्रामच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य हे हैदराबादच्या हद्दीत शिरले होते. आजच्याच दिवशी कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले 12 ते 15 टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व 426 प्रवाशांसह बुडाले होते. शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचे निधन झाले.
1666: शिवाजी महाराज सुखरुप राजगडावर पोहचले
छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. स्वराज्याची उभारणी करताना शिवाजी महाराजांना अनेक संकटं आली. पण त्या प्रत्येक संकटावर त्यांनी मात करत स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यातीलच आग्र्याची सुटका ही एक घटना. औरंगजेबासारखा दगेखोर बादशहा, कडेकोट पहारा आणि सर्वत्र निराशेचा अंधार, आशेचा एकही किरण महाराजांसमोर नाही. अशी मोठी बिकट अवस्था महाराजांची आग्रा भेटीत झाली होती. या औरंगजेब बादशहाचा कपटी व दगेखोर स्वभाव त्यांना माहीत होता. कारण शिवाजीराजे अत्यंत मुत्सद्दी, माणसांची पारख असणारे, दूरदृष्टी व राजकीय जाण असणारे होते. परंतु पुरंदरच्या तहाने महाराज कोड्यात अडकले होते. आग्र्यामध्ये औरंगजेबाने महारांजांना कैद केल्यानंतर स्वराज्यात एकच काहूर माजला. पण अगदी हुशारीने महाराज आग्र्याहून सुटले आणि त्यांनी आजच्याच दिवशी राजगडावर सुखरुप पाऊल ठेवले.
1912 : फिरोज गांधी यांचा जन्म
पत्रकार, राजकारण आणि एक प्रखर भ्रष्टाचार विरोधक म्हणून फिरोज गांधी यांची ओळख होती. 12 सप्टेंबर रोजी त्यांचा जन्म झाला. ते राज्यसभेचे देखील सदस्य होते. त्यांनी सभागृहात अनेकदा नेहरूंच्या राजकारणाचा आणि त्यांच्या राज्यकारभारचा कडाडून विरोध केला. फिरोज गांधी हे दिल्लीतील नॅशनल हॅराल्ड आणि लखनौमधील नवजीवन या दैनिकांचे प्रकाशक देखील होते. फिरोज गांधी जन्म पारशी कुटुंबात झाला होता. त्यांच नाव हे फिरोज जहांगीर घांधे असं होतं. पण महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी घांधे या आडनावाचा त्याग करुन गांधी हे आडनाव स्विकारलं. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे ते पती होते.
1948 : भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानाच्या हद्दीत
आजच्याच दिवशी भारतीय सैन्य हे हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले. सैन्याच्या याच कारवाईला पोलीस अॅक्शन किंवा 'ऑपरेशन पोलो' असं म्हटलं जातं. हैदराबाद मुक्तीसंग्रामचा शेवट याच कारवाईने झाला. निजामी शासनसत्ता अखेर 109 तासांमध्ये संपुष्टात आली. हैदराबादमध्ये करण्यात आलेली ही कारवाई म्हणजेच लष्कराचीच एक कारवाई होती. ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऑपरेशन पोलोची सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी फर्स्ट ग्वालियर लान्सर्स, मैसूर लान्सर्स, मेवाड इन्फंट्री, फोर्थ ग्वालियर इन्फंट्री, राजाराम रायफल्स, फर्स्ट मैसूर इन्फंट्री यातील दले तैनात केली. या लष्करी फौजेला हवाई दलाचे आणि रणगाड्यांचे देखील सहाय्य मिळाले होते. सदर्न कमांडचे सरसेनापती लेफ्टनंट जनरल राजेंद्रसिंह यांनी हे पुण्याच्या मुख्यालयातून या मोहीमेची सर्व सूत्र हलवली. आजच्याच दिवशी या कारवाईला सुरुवात झाली आणि तुळजापूर, नळदुर्ग, परभणी जिल्ह्यात कन्हेरगाव , कर्नुल विभागात तुंगभद्रेवरील महत्त्वाचा पूल ताब्यात घेतला.
1952 : सवाई गंधर्व यांचे निधन
भारतीय शास्रीय संगातातील एक मोठे गायक म्हणून शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर म्हणजे सवाई गंधर्व यांची ओळख होती. कुंदगोळकर यांनी नट म्हणून देखील रंगभूमीवर काम केले. त्याकाळात त्यांनी केलेल्या स्रीभूमीकेचं आजही कौतुक केले जाते. त्यावेळी बालगंधर्व यांच्या स्रीभूमिका विशेष ज्ञात होत्या पण कुंदगोळकरांच्या रूपाने स्त्रीभूमिका आणखी एक नट रंगभूमीवर अवतरला. त्यांच्या अलौकीक कामामुळे वऱ्हाडाचे नबाब म्हणून प्रसिद्ध असलेले दादासाहेब खापर्डे यांनी त्यांना सवाई गंधर्व ही पदवी दिली. बघुनी उपवनी , असताना यतिसन्निध , व्यर्थ छळिले ही त्यांची काही प्रसिद्ध नाटके आहेत.
1959 : रशियाचे 'लुना 2' हे यान चंद्रावर पोहोचले
रशियाचे मानवरहित लुना 2 हे यान चंद्रावर यशस्वीरित्या पोहचले. तसेच 12 सप्टेंबर 1959 रोजी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चंद्रावर पोहोचणारी ही पहिली मानवनिर्मित वस्तू असल्याचे मानलं जातं.
1966: भारतीय जलतरणपटू मिहिर सेनने डारडेनेल्स सामुद्रधुनी पोहून पार केले.
मिहीर सेन यांनी 12 सप्टेंबर 1966 रोजी पहिल्यांदा डारडेनेल्स सामुद्रधुनी पार करून इतिहास रचला. त्यामुळेच 12 सप्टेंबर हा दिवस देशाच्या इतिहासात महत्वाचा दिवस मानला जातो. मिहिर सेन हे लांब पल्ल्याचे जलतरणपटू होते. इंग्लिश चॅनेल ओलांडून आपल्या लांब पल्ल्याच्या जलतरण मोहिमेची सुरुवात करणाऱ्या मिहिर सेन यांनी आपल्या धैर्याने आणि दृढनिश्चयाने महासागर ओलांडण्यात यश मिळवले. डारडेनेल्स सामुद्रधुनी ओलांडणारे ते जगातील पहिले जलतरणपटू होते.
इतर महत्त्वाच्या घटना
1857 : कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले 13 ते 15 टन सोने घेऊन जाणारे एस.एस.सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने आणि 426 प्रवाशांसह बुडाले.
1919 : अॅडॉल्फ हिटलर यांनी जर्मन वर्कर्स पार्टी मध्ये प्रवेश केला.
1926 : मराठी साहित्य संशोधक विनायक लक्ष्मण भावे यांचे निधन.
1998: डॉ. जयंत नारळीकर यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2002 : मेटसॅट या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.