अमरावती : आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र दिपटे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. हल्ला करणारा व्यक्ती हा ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आमदार रवी राणा हे दहीहंडीचा कार्यक्रम संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले असताना महेंद्र दिपटे यांनी राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.अंजनगाव सुर्जी पोलिसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
आमदार रवी राणा हे सोमवारी दुपारी युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गेले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी रवी राणा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन त्याने रवी राणा यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव महेंद्र दिपटे असून तो शिवसेना ठाकरे गटाचा माजी तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर येणाऱ्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. अंजनगाव सुर्जी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. हल्ला करणारा व्यक्ती ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला असून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ही दावा रवी राणा यांनी केला आहे.
गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2022 ला हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे अंजनगाव सुर्जीला आले असता तेव्हा बांगर यांच्या वाहनावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यात महेंद्र दिपटे याचाही समावेश होता.
नवनीत राणांना धमकी देणारा तरूण गजाआड
काही दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली होती. अमरावतीच्या नेरपिंगळाई भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. श्याम तायवाडे असं त्याचं नाव आहे. या व्यक्तीने खासदार नवनीत राणा यांना धमकी देत शिवीगाळ केली होती.
श्याम तायवाडे या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना कॉल करून धमकी दिली. त्यामध्ये त्याने तिवसामधून बोलत असल्याचं सांगितलं. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही असं त्याने म्हटलं. तसेच या तरूणाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढत शिवीगाळ केली होती.
ही बातमी वाचा: