औरंगाबाद : मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करण्याची मागणी वाढल्यानं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्याकडे चर्चेसाठी वेळ मागितला आहे. राज्यातल्या दीडशेहून अधिक महिलांनी विजया रहाटकर यांची औरंगाबादेत भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.

 

तलाक शब्द उच्चारून घटस्फोट आणि पूनर्विवाहाची हलाल पद्धत मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असून, त्यात बदल करावा असं या निवेदनात म्हटलं आहे. या निवेदनावर 1100 महिलांच्या सह्या आहेत.

 

देशातील 13 राज्यांमधील महिला आयोगांकडे आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे असंच निवेदन मुस्लिम महिलांनी दिलं आहे. महिलांच्या मंदिर प्रवेशानंतर आता मुस्लिम महिलाही कालबाह्य प्रथांविरोधात बोलू लागल्या आहेत.