लातूरः पावसाळा सुरू झाला आणि जमिनीवरील गारव्याचा आनंद घेण्यासाठी बिळात लपून बसलेले नागोबा बाहेर पडले आहेत. लातूरमध्ये चार दिवसात सर्पमित्रांनी तब्बल 127 साप पकडले आहेत.

 

वनविभाकडे पकडलेल्या सर्व सापांची नोंद करण्यात आली आहे. लातूरमध्ये पहाटेपर्यंत सर्पमित्रांना साप पकडण्याचं काम करावं लागत आहे.  पकडलेले बरेचसे साप बिनविषारी असले तरी काही अशिया खंडातील सर्वात विषारी सापांपैकी आहे.

 

मराठवाड्यात जवळपास 4 वर्षांनंतर मनसोक्त पाऊस झाला आहे. गेली 3 वर्ष सततचा दुष्काळ आणि पाणीटंचाई, त्यामुळे प्रत्येक सजीवाला इथे मरगळ आली होती. पण आता चित्र बदललं आहे. दुष्काळात खोलवर दडी मारुन बसलेले अनेक जीव सध्या बिळातून बाहेर पडले आहेत.

 

अशा ठिकाणी लपतात साप

लातूरमधल्या गंगापूर भागात 80 फूट खोल विहिरीतला साप स्थानिकांना दिसला. तत्काळ सर्पमित्रांना पाचारण करण्यात आलं.. आणि सापाची सुटका झाली. आपल्या घराशेजारचा कचरा, रिकामी पिंप, टायर ही पावसाळ्यात साप येण्याची हक्काची ठिकाणं असतात. अन्नाच्या शोधात साप पावसाळ्यात सहज घरात शिरतात, असं सर्पमित्रांचं म्हणणं आहे. त्यामुळं आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.

 

काळजी घेण्याची गरज

साप आपलं बिळ कधी स्वतः बनवत नाही, त्यामुळे याकाळात हे जीव अगदी मिळेल त्या ठिकाणी जाऊन बसतात.  पण अशावेळी घाबरुन गलका करु नये, कारण यामुळे साप बिथरण्याची शक्यता असते, असं आवाहन सर्पमित्र करत आहेत. लातूरात सर्पमित्रांनी पकडलेल्या सापांमध्ये कोब्रा, नाग पासून आशिया खंडातल्या सगळ्यात विषारी सापांचाही यात समावेश आहे. अनुकूल हवामान आणि अन्नाच्या शोधात सापांचं बाहेर पडणं हा निसर्गाचा नियमचं आहे. फक्त अशावेळी आपण संयम राखून त्यांना त्यांच्या हक्काच्या जागी सोडण्याची गरज आहे.