पुणे : पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर तीचा लॅपटॉप भारतीय जनता पक्षाचे वानवडी भागातील नगरसेवक धनराज घोगरे यांनी गायब केल्याचा आरोप करण्यात आलाय. धनराज घोगरे यांनी या लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप आहे.  तशी तक्रार शिवसेनेच्या बीड जिल्हा महिला आघाडी प्रमुख संगीता चव्हाण यांनी बीड पोलिसांकडे दिली आहे.


पूजा चव्हाणचा पुण्यातील वानवडी भागातील इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्या इमारतीच्या समोरच धनराज घोगरेचे घर आहे. पूजा जेव्हा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली पडली तेव्हा तीला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांमध्ये अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांच्याबरोबर धनराज घोगरे हे देखील होते. मात्र पूजाच्या मृत्यूनंतर अरुण राठोड आणि विलास चव्हाण जसे गायब झाले तसा पूजाचा लॅपटॉप देखील गायब करण्यात आला. हा लॅपटॉप जेव्हा पूजावर उपचार करण्याचा प्रयत्न सुरू होता तेव्हा धनराज घोगरे यांनी माहिती चोरल्याचा आरोप आहे.


धनराज घोगरेने या लॅपटॉप मधील माहिती चोरून ती चित्रा वाघ यांना पुरवल्याचा आरोप आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्या विरोधात देखील संगीता चव्हाण यांनी तक्रार दिलीय. या लॅपटॉपमधून अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. पुणे पोलिसांनी देखील पूजाचा लॅपटॉप चोरीला गेल्याचा आणि आपण त्याचा शोध घेत असल्याच म्हटलय.


काय आहे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण?


मूळची बीडमधल्या परळीची असलेल्या पूजा चव्हाण या 22 वर्षाच्या मुलीचा पुण्यातील राहत्या घरातून पडून 7 फेब्रुवारीला मृत्यू झाला. पूजाने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे. इंग्लिश स्पीकिंगच्या क्लाससाठी ती पुण्यात आली होती. तिने इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची चर्चा सुरु झाली होती. भाजपने तक्रार दाखल केली होती. शिवाय विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली. त्यातच पूजा चव्हाण आणि कथित मंत्र्यांच्या एक-दोन नव्हे तर तब्बल 12 ऑडिओ क्लिप समोर आल्या. त्यानंतर या ऑडिओ क्लिपमधील आवाज संजय राठोड यांचाच असल्याचा दावा करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.


#Banjara चित्रा वाघ, देवेंद्र फडणवीसांवर अदखलपात्र गुन्हा, बंजारा समाजाची बदनामी केल्याचा आरोप