पुणे : पुण्यात 2018 या वर्षात अनेक घडामोडी घडल्या. वर्षाची सुरुवात कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराने झाली. याच वर्षी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णीना अटक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही पुण्यात केले. अशाच 2018 या वर्षात घडलेल्या 10 बातम्यांचा आढावा.
1. कोरेगाव भीमा हिंसाचाराने वर्षाची सुरुवात
2018 ची सुरुवात झाली कोरेगाव भीमामधील हिंसाचाराने. एक जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ले झाले आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले. झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडे नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी आधी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे या दोघांवर गुन्हा नोंद केला आणि मिलिंद एकबोटेंना अटक झाली. मात्र एकबोटे काही दिवसांमध्येच जामीन मिळवून बाहेर आले. त्यानंतर पुणे पोलिसांनी याच प्रकरणात माओवाद्यांचा हात असल्याचा दावा करत देशभरात अटकसत्र सुरु केलं. आधी पाच जणांना अटक झाली तर दुसऱ्या टप्प्यात आणखी पाच जणांवर गुन्हा नोंद होऊन त्यापैकी तिघांना अटक झाली. दोघांबद्दलचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. माओवाद्यांशी संबंधाचा आरोप असलेले दहा जण पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट रचत होते असाही दावा पोलिसांनी केला आणि देशभरात खळबळ उडाली. येणाऱ्या वर्षात देखील या प्रकरणात पोलिसांकडून आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे.
2. डी.एस. कुलकर्णींना अटक
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना त्यांची पत्नी हेमंतीसोबत अटक करण्यात आली आणि पुण्याच्या बांधकाम क्षेत्राला हादरा बसला. हजारों गुंतवणूकदारांनी डी. एस. के. यांच्याकडे मोठ्या विश्वासाने ठेवलेली त्यांच्या आयुष्याची बचत परत न मिळाल्याने एकच गोंधळ उडाला. पुढे या प्रकरणी डी.एस. के. यांचा मुलगा, जावई आणि कंपनीतील इतर अधिकाऱ्यांनाही अटक झाली.
3. मुठा कालवा फुटल्याने पुणे शहर जलमय
मुठा कालवा फुटला आणि सिंहगड रस्त्यावर जलप्रलय पहायला मिळाला. कालवा फुटल्याने दांडेकर पुल परिसरातील शेकडो घरांचं नूकसान झालं. अर्ध्या पुणे शहराचा पाणीपुरवठा त्यामुळे दोन दिवस बंद झाला. वर्षानुवर्षे कालव्याची डागडुजी न केल्याने कालव्यातुन गळती होत होती. मात्र खेकडे आणि उंदरांमुळे कालवा फुटल्याचा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केल्याने सगळ्यांचं मनोरंजन झालं.
4. पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार
सुरुवातीला बरसणारा पाऊस पुढे मात्र गायब झाला. त्यातच पाणी वाटपाच नियोजन नसल्याने सप्टेंबर महिन्यातच पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करण्याची वेळ आली. वर्ष संपता-संपता पुण्यावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. येणाऱ्या वर्षात पाणी कपात अटळ असल्याने नवीन वर्षात पुण्याचं पाणी चांगलंच पेटण्याची चिन्हं आहेत.
5. टेमघर धरणाची गळती
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समुहातील टेमघर धरणाची गळती वर्षभराच्या दुरुस्तीनंतर देखील रोखण्यात अपयश आलं. जलसंपदा विभागाचा दावा त्यामुळे फोल ठरला. पावने चार टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता असलेलं टेमघर धरण 2018 मध्ये देखील दुरुस्त न झाल्याने पुण्याच्या पाणी समस्येत आणखीणच भर पडली.
6. होर्डींग कोसळल्याने चार जणांचा मृत्यू
पुण्यातील शाहिर अमर शेख चौकातील रेल्वेच्या जागेतील होर्डींग चौकात सिग्नलला उभ्या असलेल्या वाहनांवर कोसळलं आणि चार जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी रेल्वेच्या इंजिनिअरला, अधिकाऱ्याला आणि कामगाराला अटक केली. काही दिवसांनी होर्डींग ज्या कंपनीचे होते त्या कंपनीच्या मालकालाही अटक झाली. मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मात्र कारवाई झाली नाही.
7. पाटील इस्टेट वसाहतीला भीषण आग
पुण्यातील पाटील इस्टेट वसाहतीला भीषण आग लागली आणि अडीचशेहून अधिक घरं जळून खाक झाली. या वसाहतीतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न त्यामुळे पुन्हा ऐरणीवर आला.
8. मोदींनी केलं मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन केले. पहिल्या दोन टप्प्यांचे काम दोन वर्षांनंतर देखील तीस टक्क्यांपेक्षा अधिक झालेलं नाही. मात्र तरीही निवडणूकांच्या तोंडावर मोदींनी तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन केले. येणाऱ्या वर्षात पुणेकरांना मेट्रोत बसायला मिळेल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण होते का याकडे पुणेकरांचे लक्ष असेल.
9. मराठा मोर्चाचा उद्रेक
राज्यभरात झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे केंद्र पुणे होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मागासवर्ग आयोगाने पुण्यातच घेतला. मात्र त्या आधी मराठा आंदोलनात मोठा हिंसाचार देखील पहायला मिळाला. खासकरून चाकणच्या औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्यांचे आणि वाहनांचे नुकसान झाले.
10. अरुणा ढेरे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सलग दुसऱ्या वर्षी अरुणा ढेरेंच्या रुपाने पुण्याकडे आले. मागील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद लक्ष्मीकांत देशमुख यांच्याकडे होते.
घडलं बिघडलं | 2018 मध्ये पुण्यात घडलेल्या 10 घटना
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे
Updated at:
30 Dec 2018 01:21 PM (IST)
2018 वर्षाची सुरुवात कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराने झाली. याच वर्षी पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णीना अटक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजनही पुण्यात केले. अशाच 2018 या वर्षात घडलेल्या 10 बातम्यांचा आढावा.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -