10th January In History:  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदवलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 10 जानेवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 1965 च्या युद्धानंतर भारत-ताश्कंदमध्ये आजच्या दिवशी करार झाला. तर, सुरतेवर स्वारी करून छत्रपती शिवाजी महाराजांचे राजगडाकडे प्रयाण आजच्या दिवशी झाले. 


जागतिक हिंदी दिवस (World Hindi Day)


जगभरात आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीबाबत जनजागृती करण्यासाठी 10 जानेवारी रोजी दरवर्षी जागतिक हिंदी दिवस (World Hind Divas) साजरा केला जातो. परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय हिंदी दिवस आणि जागतिक हिंदी दिवस यामध्ये फरक आहे. राष्ट्रीय हिंदी दिवस हा 14 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. 



1666: सुरतेवर स्वारी करून शिवाजी महाराजांचे राजगडाकडे प्रयाण


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरतवरील छाप्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील घेण्यात आली. मुघल साम्राज्यातील जागतिक व्यापारी आणि आर्थिक केंद्र असणाऱ्या सूरतवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वात छापा मारण्यात आला. सुरतेच्या बंदरातून भारताचा जगातील इतर देशांसोबत व्यापार चाले. कापड, मसाल्याचे जिन्नस, चंदन, कस्तुरी, हस्तिदंताच्या सुशोभित वस्तू, अत्तर, रेशीम, जरीचे कापड, नक्षीदार भांडी, गालिचे आदी व्यापार येथे होता. सुरतमधील छाप्यात सोने,चांदी,हिरे, मोती भरपूर सापडले. सूरतचा सुभेदार  इनायतखान याने कपटाने शिवाजी महाराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मावळ्यांनी हा हल्ला परतवून लावला. त्यानंतर चिडलेल्या मावळ्यांनी सूरतमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वारी करत मोठी संपत्ती मिळवली. सूरतवरील स्वारी औरंगजेबाच्या साम्राज्याला मोठा धक्का बसला. सूरतेवरील स्वारीत मिळालेल्या संपत्तीचा वापर स्वराज्यासाठी करण्यात आला. 


1730: शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात 


पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले. 1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाजाचे काम होण्यास 1760 हे वर्ष उजाडले. अठराव्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान आणि कार्यालय होते. शनिवारवाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. 


1870: स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना


जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली. ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक, परिवहन, शुद्धीकरण आणि विक्री करणारी कंपनी होती. स्टँडर्ड ऑइलने तेलाचे उत्पादन आणि हाताळण्याच्या प्रक्रियेत अनेक शोध लावून उत्पादनखर्च कमी केला व त्याद्वारे इतर तेलकंपन्याशी स्पर्धा करून त्यांच्यावर वर्चस्व मिळविले. 



1870: चर्चगेट रेल्वे स्थानकाची सुरुवात


मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाची 10 जानेवारी 1870 रोजी सुरुवात झाली. बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या अखत्यारीत स्थानकाची सुरुवात झाली. त्यावेळी एकाच प्लॅटफॉर्मवरून सुरुवात करण्यात आली होती. सध्या चार प्लॅटफॉर्म असून लाखो प्रवाशांची वर्दळ या स्थानकात असते. 


1884: जोज़फ एस्पीडियन यांनी सिमेंटचा शोध लावला


ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले. सिमेंटच्या शोधामुळे बांधकाम व्यवसायात, कामात मोठे बदल झाले. 


1920: पहिले महायुद्ध संपुष्टात


व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले. पहिल्या महायुद्धानंतर मित्र राष्ट्रे व जर्मनी ह्यांमध्ये 28 जून 1919 रोजी व्हर्साय येथे तह झाला होता. याला ‘पॅरिसचा तह’ म्हणूनही ओळखला जातो. 


1966: भारत-पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार 


ताश्कंद करार, ताश्कंद डिक्लरेशन तथा ताश्कंद अ‍ॅग्रिमेंट हा शांतता करार भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताश्कंद येथे 10 जानेवारी 1966 रोजी झाला. 1965 च्या भारत पाकिस्तान युद्धात पाकिस्तानने सपशेल पराभव दिसत असताना इतर देशांच्या मध्यस्थीने हा करार करण्याचा प्रस्ताव मांडला. 4 ते 10 जानेवारी 1966 मध्ये ताश्कंद येथे झालेल्या बैठकीत संयुक्त राष्ट्रे, अमेरिकी सरकारचे प्रतिनिधी आणि सोव्हिएत रशियन सरकारचे वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या करारानंतर पाकिस्तानने भारतावर केलेल्या आक्रमणानंतर सुरू झालेल्या युद्धाची समाप्ती झाली. भारतीय सैन्याने शौर्य दाखवत पाकिस्तानी सैन्याची धूळधाण उडवली होती. 


1974: अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म (Hrithik Roshan Birthday)


भारतीय अभिनेता हृतिक रोशन याचा आज वाढदिवस. हृतिकने अनेक चित्रपटांमधील आपल्याअभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पहिल्याच चित्रपटाला घवघवीत यश मिळाले होते. हृतिक रोशनने आपल्या कारकिर्दीत विविध व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन हे त्याचे वडील आहेत. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशा’ चित्रपटात वयाच्या सहाव्या वर्षी तो रुपेरी पडद्यावर पहिल्यांदा दिसला होता. यानंतर त्यांने ‘आप के दिवाने’ (1980), ‘आस-पास’ (1981) या चित्रपटांमध्ये देखील बालकलाकार म्हणून काम केले. 


इतर महत्त्वाच्या घडामोडी 


1870: पानिपतच्या युद्धात मराठा सैन्याचे शूर सेनापती रणवीर दत्ताजी शिंदे (Dattaji Shinde) यांचा बलिदान दिवस. नजीबखानने त्यांना ठार केले.  नजीबने त्यांना विचारले होते 'क्यूॅं मरहट्टे और लढोगे ?' त्यावर दत्ताजीने दिलेले 'क्यूँ नही, बचेंगे तो और भी लढेंगे हे उत्तर अजरामर झाले. 


1775: बाजीराव पेशवे (दुसरे) यांचा जन्म (Bajirao )


1853: चार्ल्स पिअर्सन यांच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या 7 किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली. (London Underground Railway)


1896 नरहण विष्णू गाडगीळ उर्फ काकासाहेब गाडगीळ यांचा जन्म. काकासाहेब गाडगीळ हे स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल होते. 


1940: सुप्रसिद्ध गायक के.जे. येसूदास यांचा जन्म  (K. J. Yesudas Birthday)